कल्याणीनगर दुर्घटनाप्रकरणी काँग्रेसची आगळी निबंध स्पर्धा; ‘ माझी आवडती कार ’, ‘माझा बाप बिल्डर असता तर, ’ ‘ मी पोलीस अधिकारी झालो तर’ आदी होते स्पर्धेचे विषय

पुणे शहर कॉंग्रेसने कल्याणीनगर दुर्घटनेप्रकरणी लोकजागृतीसाठी आयोजित केलेल्या विडंबनात्मक राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेस रविवारी उत्साही प्रतिसाद मिळाला. ही निबंध स्पर्धा बाल न्याय मंडळाने गेल्या रविवारी दिलेल्या आदेशाची खिल्ली उडविणारी व वाहतुकीच्या नियमांच्या जागृतीसाठी होती.

कल्याणीनगर दुर्घटनाप्रकरणी काँग्रेसची आगळी निबंध स्पर्धा

पुणे शहर काँग्रेसने कल्याणीनगर दुर्घटनेप्रकरणी लोकजागृतीसाठी आयोजित केलेल्या विडंबनात्मक राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेस रविवारी उत्साही प्रतिसाद मिळाला. ही निबंध स्पर्धा बाल न्याय मंडळाने गेल्या रविवारी दिलेल्या आदेशाची खिल्ली उडविणारी व वाहतुकीच्या नियमांच्या जागृतीसाठी होती. या स्पर्धेत सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी भाग घेतला. स्पर्धेत खासगी सुरक्षा रक्षकापासून ते संगणक अभियंत्यांपर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. एक महिला तर नगरहून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. स्पर्धेत लिहिलेले निबंध पुणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षकांना देणार असल्याची माहिती रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ‘सीविक मिरर’ ला दिली. 

कल्याणीनगरमधील भीषण अपघातप्रकरणी लोकजागृती व्हावी म्हणून पुणे शहर कॉंग्रेसने उपहासात्मक राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा रविवारी आयोजित केली होती. ही निबंध स्पर्धा बाल न्याय मंडळाने दिलेल्या आदेशाची खिल्ली उडविणारी व वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी आयोजित केली होती. स्पर्धा कल्याणीनगरमध्ये जेथे अपघात झाला त्या बॉलर पबसमोर आज सकाळी नऊ ते बारा दरम्यान झाली. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सतरा वर्षे आठ महिन्यांपासून ते ५८ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा होती. निबंध स्पर्धेला तीनशे शब्दांची मर्यादा होती. स्पर्धेचे विषय माझी आवडती कार ( पोर्शे, फरारी, मर्सिडिज की अन्य), माझा बाप बिल्डर असता तर, दारूचे दुष्परिणाम, आजची तरुण पिढी अन् व्यसनाधीनता, अश्‍विनी कोस्टा व अनिश अवधियांचे खरे मारेकरी कोण असे होते. स्पर्धेचे निमंत्रक सुनील मलके यांनी स्पर्धेचे आयोजन केले.  

पुणे शहर युवक कॉंग्रेसने कल्याणीनगर अपघाताच्या विरोधात जनमताचा रेटा वाढविण्यासाठी या आगळेवेगळ्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्याला ११ हजार १११ रुपये, तर व्दितीय क्रमाकांस ७७७७/- रुपये, तृतीय क्रमांकास ५५५५/- रुपये, तर उत्तेजनार्थ दहाजणांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस दिले गेले.आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest