अखेर नवी खडकी येथील शाळेत बांधले शौचालय
नवी खडकी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनमधील शौचालय बांधून पूर्ण झाले असून ते वापरायोग्य असल्याची ग्वाही येरवडा-कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त विजय नाईकल यांनी दिली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनमध्ये शौचालय नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींसह शिक्षिकांची हेळसांड होत असल्याचे वृत्त 'बिन शौचालयाची शाळा' या शिर्षकाखाली १ डिसेंबरच्या 'सीविक मिरर'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिका प्रशासानाने हा प्रश्न मार्गी लावत विद्यानिकेतनमधील शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे छायाचित्रही शेअर केले आहे. शौचालया अभावी शाळेतील विद्यार्थिनींसह शिक्षिकांची हेळसांड होत होती. सीविक मिररने या समस्येची दखल घेतल्यामुळे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने युद्धपातळीवर शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले. दरम्यान सहाय्यक महापालिका आयुक्त नाईकल यांनी नवी खडकीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली होती. त्यानंतर कर्मवीर पाटील विद्यानिकेतनमधील शौचालयाच्या कामाला वेग आला. तत्पूर्वी शौचालयाचे काम कासवगतीने सुरू होते. मात्र दोन ते तीन दिवसात जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे शौचालयाचे काम पूर्ण झाले.
नवी खडकी येथील लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन चरर इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील विद्यार्थी येथील शौचालयाचा वापर करीत असत. याच इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. त्यामुळे शौचालय एक शाळा तीन म्हणून प्रत्येक शाळेने स्वतंत्र शौचालयाची मागणी केली होती. यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेने शौचालयातील दुर्गधीमुळे तळमजल्यावरील शौचालय बंद केले होते. शाळेच्या मागील शौचालयाला कुलूप लावून ते त्यांच्याच मुलांसाठी वापरात ठेवले. त्यानंतर येथे क्रिडानिकेतन सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थी संख्या हजाराच्या पुढे गेल्यामुळे यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दुसऱ्या मजल्यावर एका वर्गखोलीत शौचालय बांधून घेतले. त्याचा वापर ते त्यांच्या विद्यार्थ्यांसाठीच करू लागले. दरम्यान कर्मवीर पाटील विद्यानिकेतनने शौचालय बांधण्याची मागणी केला. मात्र जागा नाही, वर्ग खोल्या कमी आहेत, अशी कारणे देत गेली दहा वर्षापासुन शौचालय बांधले गेले नव्हते.
दरम्यान दोनच महिन्यापूर्वी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार घेतलेले सहाय्यक महापालिका आयुक्त विजय नाईकल यांनी शौचालय बांधण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी नवी खडकीतील सहा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शौचालयाचा प्रश्न मार्गी लावला. येरवडा परिसरातील विशेषतः लक्ष्मीनगर, यशवंतनगर, नवी खडकी, पर्णकुटी चौक येथील शाळांच्या शौचालयांची स्वच्छता दररोज नियमित करण्यात येणार आहे. शाळेत सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन व डिस्पोजीबल मशीन बसविण्यात येणार असल्याची माहिती विजय नाईकल यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.
गेली अनेक वर्ष कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनला शौचालय नसल्याची वस्तुस्थिती होती. मात्र येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने शाळेच्या पहिल्या मजल्यावर शौचालय बांधून पुर्ण झाले आहे. शौचालयाचा वापर आता विद्यार्थी करू शकतात.
- विजय नाईकल, सहाय्यक महापालिका आयुक्त