पुण्यात ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल’ जोरात
पुणे: शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल १५५ विविध समारंभ धावत्या मेट्रोमध्ये पार पडले आहेत. यामध्ये लहान मुलांचा वाढदिवस असो, विवाहाचा वाढदिवस असा वा साखरपुडा, आयुष्यातील विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल’च्या (Celebration on Wheel) माध्यमातून ही संधी पुणेकरांना दिली आहे. त्याचा फायदा घेत अगदी नगण्य शुल्कात पुणेकर विविध कार्यक्रम धावत्या मेट्रोमध्ये साजरा करत आहेत.
मेट्रो रेल्वे ही पिंपरी-चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रामवाडीदरम्यान धावत आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी महामेट्रोमध्ये लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यात लहान मुलांचे वाढदिवस, ज्येष्ठांचे वाढदिवस मेट्रोमध्ये साजरे झाले. त्याचबरोबर विवाहाची बोलणी, साखरपुडा, लग्नाचा वाढदिवससुध्दा धावत्या मेट्रोमध्ये साजरा झाला आहे. याचा खर्च एखाद्या सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी आहे. कार्यक्रम करणाऱ्या गटाला किंवा समूहाला तिकिटांसह अवघे पाच हजार रुपये शुल्क महामेट्रोकडून आकारले जाते.
महामेट्रो अशा प्रकारचे अभिनव उपक्रम नागपूर मेट्रोमध्ये राबवित आहेत. त्याच धर्तीवर पुणे मेट्रोमध्येसुद्धा (Pune Metro ) असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती महामेट्रोचे संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
मेट्रो स्थानकावर होणार विविध कार्यक्रम
नागपूर मेट्रो स्थानकावर १५ ऑगस्ट रोजी महिलांसाठी मेहंदी उत्सव रंगला होता. याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मेट्रो स्थानकावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा महामेट्रोचा विचार आहे. असे विविध उपक्रम पुणे मेट्रोच्या ३० स्थानकात राबविण्याचे नियोजन भविष्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
गेल्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रामवाडी मार्गातील मेट्रोमध्ये ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ उपक्रमांतर्गत विविध लहान-मोठे असे १५५ कार्यक्रम झाले. यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस, साखरपुडा, विवाहाचे वाढदिवस आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये १ लाख १० हजार ७१५ प्रवाशांनी सहभाग घेतला. यातून एकूण ७ लाख ७५ हजार रूपयांचा महसूल महामेट्रोला मिळाला. त्यासाठी प्रत्येक गटाला मेट्रोच्या रिटर्न प्रवास शुल्कासह पाच हजार रुपये आकारण्यात येतात.- डॉ. हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो, पुणे