संग्रहित छायाचित्र
दहावी आणि बारावीत हमखास पास करून देण्याची लेखी हमी देणारे पासिंग सेंटर, कोचिंग सेंटर आणि इंटीग्रेटेड कॉलेजेस राज्यभरात उदयाला आली आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात परीक्षा केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. या अडवळणाच्या केंद्रावर राज्यातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खास येतात. साधी रिक्षा सुद्धा न येणाऱ्या या गावांमध्ये परीक्षेच्या काळात लाखोच्या कार उभ्या असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पासिंगसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली असते. आता अशा परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एचएससी बोर्डाकडून सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
सामुहिक कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी एचएससी बोर्डाने हे मोठे पाऊल टाकलं आहे. सीबीएसई परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. या तिसऱ्या डोळ्यामुळे अशा पासिंग सेंटरच्या गोरखधंद्याला आळा बसेल, असा विश्वास शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीलाही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसविणे आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी, अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या आहेत. बोर्डाकडून तयार केलेल्या यादीतील संवेदनशील परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सामुहिक कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.
तर परीक्षा केंद्रच रद्द...
परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. यासंदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना महाराष्ट्र राज्य माध्यमक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (एचएससी बोर्ड) अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘‘आजही अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवाळीनंतर परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला सुरुवात होणार आहे.’’
७५ टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
राज्याच्या गल्लीबोळात सुरू झालेल्या कोचिंग क्लासेसचे रुपांतर इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये होते. विद्यार्थ्यांना लगतच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला जातो. अकरावी आणि बारावीला वर्गात न बसता केवळ प्रात्यक्षिक परीक्षेला हजर राहणे, प्रोजेक्ट जमा करणे आणि अंतिम बोर्ड परिक्षेला बसणे हा ट्रेंड सध्या सुरू आहे. जेईई, नीट आणि एमएच सीईटी अशा परिक्षांचा पूर्णवेळ अभ्यास करणे आणि औपचारिकता म्हणून अकरावी, बारावीला प्रवेश घेणे यावर आता बंधन येणार आहे. कारण ७५ टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस इंटिग्रेटेड कॉलेजवर आळा बसेल, असा विश्वास एचएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केला आहे.