५०० मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई
पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा (Pune Crime News) देण्यासाठी तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (Maratha Kranti Morcha) मुंबई बेंगलोर महामार्गावर रस्ता अडवण्यात आला होता. तसेच या ठिकाणी टायर जाळण्यात आले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यामध्ये जवळपास ४००-५०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले, योगेश दसवडकर यांच्या सह इतर ४०० ते ५०० कार्यकर्त्यांविरुद्ध भादवि १४३, १४७, १८८, ३४१, ३३६ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१)(३) १३५ सह क्रिमिनल अमेंडमेंट लाॅ ऍक्ट ०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन निवृत्ती खुटवड यांनी फिर्याद दिली आहे.
आंदोलकांनी मंगळवारी दुपारी सव्वाबारा ते पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ मुंबई बेंगलोर महामार्गावर मुंबईकडून साताराकडे जाणाऱ्या मार्गिकेवर असलेल्या व्ही आर एल टूर्स ट्रॅव्हल्स कंपनी समोर व साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर विश्वास हॉटेलच्या समोर आंदोलन केले. मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर टायर ट्यूब, टायर्स ट्यूब,प्लास्टिक कॅन आदी जाळले. लोकांच्या जीवितस धोका होईल याची जाणीव असताना सुद्धा हे साहित्य पेटवून दिले. आक्रमक होऊन घोषणा देऊन वाहतूक बंद केली. तसेच, प्रवासी गाड्यातील प्रवासी व आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण जाधव करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.