प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, आता लक्ष मतदानाकडे

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा आता थंडावणार असून सर्वांचेच लक्ष २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून त्यानंतरच उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, उखाळ्यापाखाळ्यांना पूर्णविराम, बड्या लढतींबद्दल सगळ्यांच्याच मनात उत्सुकता

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा आता थंडावणार असून सर्वांचेच लक्ष २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून त्यानंतरच उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. राज्याप्रमाणेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रचाराची धामधूम संपली असून आता सर्वांचे लक्ष जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यावर असेल.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीतील बंडखोरांनी पक्षादेश झुगारून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. कसबा विधानसभा मतदारसंघात माजी महापौर कमल व्यवहारे, तर पर्वती मतदारसंघातून काँग्रेस माजी उपमहापौर आबा बागूल आणि शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद यांनी काँग्रेस पक्षातून बंड पुकारले. याउलट भाजप महायुतीला नाराज नेत्यांचे बंड शमविण्यात यश आले. उमेदवार नक्की केल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारावर भर दिला. गेले काही दिवस शहर आणि जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचाराची धावपळ पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीसह सगळेच उमेदवार पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कोपरा सभा, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात व्यस्त होते. त्यानंतरच्या काळात प्रत्येक पक्षाच्या बड्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख (शरद पवार गट) शरद पवार, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.

महायुती आणि महाविकास आघाडीची थेट लढत असलेल्या अनेक मतदारसंघात बड्या नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. याखेरीज विकासाच्या मुद्यांवरही वादविवाद ऐकायला मिळाला. शहरातील सर्वच मतदारसंघात आणि विशेषतः पोटनिवडणुकीमुळे गाजलेल्या कसबा मतदारसंघातील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागल्याचे दिसून आले. महायुतीचे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. इथे मनसेनेही गणेश भोकरेंना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी अपक्ष लढत देण्याचा निर्णय घेतल्याने इथल्या निकालाबद्दल उत्सुकता लागली आहे. 'कसबा'प्रमाणेच पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघातही काँग्रेसच्या बंडखोरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केल्याने तिरंगी लढतीत कोणाला फायदा होणार, याकडे लक्ष लागले आहे. पर्वतीत भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या

अश्विनी कदम (राष्ट्रवादी शरद पवार) उभ्या असून काँग्रेसचे बंडखोर आबा बागूल मैदानात आहेत. कोथरूड मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उबाठाच्या चंद्रकांत मोकाटे यांचे आव्हान आहे तर इथे मनसेतर्फे किशोर शिंदे रिंगणात आहेत. खडकवासल्यात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके उभे आहेत. इथे मनसेचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयूरेशला मनसेने मैदानात उतरवले आहे. शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे मैदानात आहेत. शहरातील हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत आहे. हडपसरमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रशांत जगताप यांना मैदानात उतरवले आहे, तर वडगाव शेरीत अजित पवारच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे यांच्याशी लढत होत आहे. कधीकाळी शरद पवारांचे वर्चस्व आणि नंतर अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता वर्चस्वासाठी दोन पवारांच्यात लढत होत असल्याचे चित्र आहे. पिंपरी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात शरद पवारांनी सुलक्षणा शीलवंत यांना उतरवले आहे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या शंकर जगताप आणि शरद पवार गटाच्या राहुल कलाटे यांच्यात लढत होत आहे. याशिवाय भोसरी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शरद पवारांनी अजित गव्हाणे यांना मैदानात उतरवले आहे.

जिल्ह्यातील तीन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 
जिल्ह्यातील आकर्षणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या चुलत्या-पुतण्यातील लढतीकडे तर अख्ख्या राज्याचे अक्ष लागलेले आहे.  इंदापुरात ऐनवेळी तुतारी घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांच्यात लढत होत आहे. पक्षफुटीत अजित पवारांसोबत गेलेले आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार  दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी देवदत्त निकम यांना उभे केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story