संग्रहित छायाचित्र
बेकायदेशीर औषधांच्या काळ्या बाजारावर ‘सीविक मिरर’ ने वेळोवेळी केलेल्या शोधपत्रकारितेतील भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. कॅन्सरविरोधी औषध असल्याचा दावा करत एका औषधविक्रेत्याने विकलेल्या इंजेक्शनमध्ये केवळ ग्लुकोज आणि डिस्टिल वॉटर असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे ही इंजेक्शन अव्वाच्या सव्वा १ ते ३ लाखांच्या किमतीला विकली जातात. याकडे सरकारी, अन्न-औषध प्रशासन (फूड ॲण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन- एफडीए) अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे.
मूळत: जपानमधील पण भारतात मुंबईतून काम करत असलेल्या टाकेडा फार्मास्युटिकलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नागरिकांच्या प्राणाशी खेळणारा भ्रष्टाचाराचा प्रकार उघड झाला असून त्यात औषध विक्रेतेच नव्हे तर अनेक सरकारी अधिकारी सामील असल्याचे आढळले.
टाकेडा फार्मास्युटिकलचे मुंबईतील एक अधिकारी महेश कांबळे याबाबत ‘सीविक मिरर’ शी बोलताना म्हणाले की, पुण्यातील सिंहगड रोडवरील श्रीप्रसाद कुलकर्णी नावाचा औषध विक्रेता हे बनावट कॅन्सरविरोधी औषध विकत होता. एवढेच नव्हे तर हे औषध आमच्या कंपनीने बनविल्याचा दावा करत होता. हे कळल्यानंतर आम्ही स्टिंग ऑपरेशन हाती घेण्याचे ठरवले. आम्ही एक बनावट कॅन्सर रुग्ण त्यांच्याकडे पाठवल्यावर कुलकर्णी याने पिंपरी-चिंचवडमधील निरामय रुग्णालयात भेटीसाठी बाेलावले. यावेळी आम्ही सापळा रचून पोलिसांच्या मदतीने कुलकर्णीला रंगे हाथ पकडले. यावेळी चौकशीत कुलकर्णीने हा सगळा प्रकार फ्रॉड असल्याचे कबूल केले. तसेच आपण विकत असलेले कॅन्सरविरोधी औषध म्हणजे धूळफेक असल्याचेही मान्य केले. आम्ही त्याच्याकडील औषधाचा नमुना घेतला आणि त्याची आमच्या प्रयोगशाळेत तपासणी केली. यावेळी ते औषध बनावट असल्याचे आढळले. केमोथेरपीचे उपचार टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना तो ही औषधे विकत होता. या औषधासाठी तो रुग्णांकडून लाखावर रक्कम उकळायचा. एवढेच नव्हे तर सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे गेली तीन वर्षे तो अशा बनावट औषधांची विक्री करत होता. या औषधविक्रीतील सर्वाधिक धक्कादायक प्रकार म्हणजे जे रुग्ण मृत्युशय्येवर आहेत आणि आपले प्राण वाचवण्याचा आटापिटा करत आहेत अशा असाहाय्य रुग्णांची अशी फसवणूक करणे, त्यांना नाडणे हा अमानवी कृत्याचा कळस म्हणावा लागेल. मृत्युशय्येवरील रुग्णांचीही तुम्हाला दया येत नाही, ही अत्यंत घृणास्पद बाब म्हणावी लागेल.
या प्रकरणातील धक्कादायक बाबी येथेच संपत नाहीत. श्रीप्रसाद कुलकर्णी याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्या मदतीला ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी धावून आले. एवढेच नव्हे तर आपली ओळखपत्रे दाखवून त्यांनी शासकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घृणास्पद रॅकेटमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असावा ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल. हे केवळ रॅकेट नाही तर मोठे कटकारस्थान आहे.
श्रीप्रसाद कुलकर्णी याच्याविरुद्ध काही कारवाई केली आहे का, या प्रश्नावर कांबळे म्हणाले, या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मात्र, अन्न-औषध प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. अन्न-औषध प्रशासनाने त्याचा औषध परवाना तातडीने रद्द करावयास हवा. मात्र, यावर कारवाई करण्याबाबत त्यांनी ठोस पावले उचलली नसून कोणती कारवाई करायची यावर त्यांचा विचार सुरू असावा.
‘सीविक मिरर’ ने जेव्हा अन्न-औषध प्रशासनाचे (फूड ॲण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन- एफडीए) पुण्यातील औषध संयुक्त आयुक्त गिरीश हुकारे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, या प्रकरणातील आरोपी तुर्कीहून औषधाच्या साहित्यांची आयात करत होता. तेथे त्याची किंमत कमी असल्याने हा उद्योग तो करत होता. औषधाच्या नावाखाली असाहाय्य नागरिकांच्या प्राणाशी खेळणे धक्कादायक आणि क्रूरतेचा कळस आहे. आम्ही त्याचा परवाना रद्द करण्याचा विचार करत आहोत.
ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनीही याबाबत ‘सीविक मिरर’ शी बोलताना संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, अशा प्रकारचे औषधविक्रेते आमच्या व्यवसायाला काळिमा फासणारे आहेत. त्यांना असे सोडू नये. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जबर दंड ठोठवावा.
या प्रकरणातील आरोपी कुलकर्णी याच्याकडे शेवटच्या टप्प्यात प्राण वाचवू शकणाऱ्या औषधांची गरज असणाऱ्या चिंताजनक स्थितीतील रुग्णांची यादी होती. एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी काम करणारे एजंट औषधे उपलब्ध असल्याचा संदेश रुग्णांकडे पाठवत होते. आता या औषधांची किंमत कल्पनेपलीकडची असायची. ॲडसेट्रिस ५० मिग्रॅ नावाचे इंजेक्शन अशा प्रकारच्या रुग्णासाठी वापरले जाते. ज्या रुग्णांना केमोथेरपीला सामोरे जावयाचे नाही किंवा हा उपचार टाळावयाचा आहे, अशा रुग्णांसाठी हे इंजेक्शन कायदेशीर मार्गाने भारतात उपलब्ध नाही. या इंजेक्शनमध्ये वापरलेले बनावट घटक अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असे हुकारे यांनी सांगितले.
कसा होतो घोटाळा?
आता हे औषध जप्त केले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र, या धक्कादायक प्रकाराने नागरिकांचा औषध क्षेत्र आणि सरकारी प्रशासनावर असलेला विश्वास डळमळीत झाला आहे. याबाबत महेश कांबळे म्हणाले, कॅन्सरशी झुंजणारे अनेक रुग्ण या फसवणुकीला अजाणता बळी पडले आहेत. अशी फसवणूक होण्यामध्ये अनेक लोक सहभागी असून त्यांचे अधिकाऱ्यांशी संगनमत झालेले आहे असे दिसते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.