येरवडा कारागृहात लवकरच बायोमेट्रिक!
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासह कैद्यांच्या हाणामारीच्या घटना आता रोखल्या जाणार आहेत. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक बराक आणि सर्कलसाठी 'बायोमेट्रिक गेट सिस्टीम' बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कैद्याला एका बराकीतून दुसऱ्या बराकीत प्रवेश करता येणे अशक्य होणार आहे. अशी यंत्रणा असणारे हे राज्यातील पहिलेच कारागृह ठरणार आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २,३२३ कैदी क्षमता आहे. मात्र, या ठिकाणी कैद्यांची संख्या ७ हजार पर्यंत पोहोचली आहे. येरवडा कारागृह राज्यातील सर्वाधिक कैदी संख्या असलेले कारागृह आहे. येरवडा कारागृह अतिशय सुरक्षित असल्याचे समजले जाते. कारागृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील कैदीसुद्धा ठेवले जातात. त्यामुळे येथे कैदी दाटीवाटीने राहात असल्याचे वास्तव आहे. एका बाजूला एवढी मोठी कैदी संख्या असल्यामुळे कारागृह प्रशासनाला या कैद्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. कैद्यांमध्ये अनेकदा मारामारी होते. यामध्ये एखाद्या कैद्याचा मृत्यूसुद्धा होतो. त्यासाठी कारागृह प्रशासनाने बायोमेट्रिक गेट सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाची एकूण कैदी क्षमता २,३२३ आहे. मात्र, कारागृहात तिपटीपेक्षा अधिक कैदी म्हणजे ७ हजारांपर्यंत कैदी आहेत. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक तर किशोर विभागात तीन बराक आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्णकैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशा विविध बराकींमध्ये कैदी ठेवले आहेत. यातील जवळपास सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता येरवडा कारागृहात कैद्यांची नेहमी मारामारी होत असते.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात ४५ बराक, १३६ विभक्त कोठडी आणि १४ अतिसुरक्षा विभाग (अंडा सेल) आहेत. कारागृहात कैद्यांना विविध बराक आणि सर्कलमध्ये ठेवले जाते. जुनी भांडणे, सूड आणि वर्चस्वाच्या कारणावरून एका सर्कल किंवा बराकीत शिक्षा भोगणारे कैदी दुसऱ्या बराकीत जाऊन मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करतात. या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कारागृहात प्रत्येक बराक, सर्कल आणि विभक्त कोठडीत बायोमेट्रिक गेट सिस्टीम बसविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.
कारागृहात पॅनिक अलार्म बटण
एखाद्या बराक किंवा सर्कलमध्ये कैद्यांची हाणामारी किवा काही अनुचित घटना घडल्यास त्याची प्रशासनाला तत्काळ माहिती मिळावी, यासाठी पॅनिक अलार्म बटण बसविण्यात येत आहे. त्यामुळे मोठी अनुचित घटना वेळीच रोखता येणार आहे. याशिवाय कारागृहातील प्रत्येक कैद्याला प्रशासनाची सूचना एकाच वेळी ऐकू येण्यासाठी बराकमध्ये मध्यवर्ती ध्वनिवर्धक यंत्रणा लावण्यात येणार आहे.
'गेट सिस्टीम' म्हणजे काय ?
गेट सिस्टीममध्ये सुरक्षा रक्षकांच्या परवानगीनंतरच लोखंडी प्रवेशद्वार उघडल्यावर कैद्याला बाहेर किंवा आत जाता येणार आहे. 'गेट सिस्टीम' मुळे बराकीत असणाऱ्या कैद्याने 'बायोमेट्रिक मशिनवर अंगठा दाबल्यावरच त्याला बाहेर जाता आणि आत येता येईल. त्यामुळे बराकीतील अन्य कैद्याला दुसऱ्या बराकीत शिरता येणार नाही.
यंत्रणेची कार्यपद्धती कशी?
बराक, सर्कल आणि विभक्त कोठडीत शिक्षा भोगणा-या प्रत्येक कैद्याच्या अंगठ्याची महिती बायोमेट्रिक मशिनमध्ये नोंदवण्यात येणार आहे. बराक किंवा सर्कलमध्ये आत जाताना किंवा बाहेर येताना गेट सिस्टीम 'वर अंगठा ठेवावा लागेत, त्यानंतर ये-जा करता येईल. त्यामुळे इतर बराकीतील कैद्यांना दुसऱ्या बराकीत प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे मारहाणीच्या घटनांना आळा घालता येईल. सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांच्या हजेरीची नोंदही बायोमेट्रिकमध्ये होणार आहे.