सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ ओव्हरऑल रँकिंगमध्ये ३५ व्या तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. गेल्या वर्षी ओव्हरऑल रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ २५ व्या क्रमांकावर होते.
विद्यापीठांच्या कामगिरीच्या आधारे दरवर्षी शिक्षणमंत्र्यांकडून क्रमवारी जाहीर केली जाते. त्यानुसार सोमवारी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी २०२३ ची क्रमवारी जाहीर केली. नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत.
गेल्या तीन वर्षात पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण होत चालली आहे. २०२०मध्ये पुणे विद्यापीठ १२ व्या क्रमांकावर होते. तर २०२१ मध्ये ११ व्या क्रमांकावर होते आणि नंतर २०२२ मध्ये २५ व्या क्रमांकावर येऊन पोहोचले होते. मात्र, यावर्षी थेट ३५ व्या क्रमांकावर घसरले आहे. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रास ८६.६९ टक्क्यांसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ८३.०९ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली ८२.१६ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच पुण्याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) या यादीत ३४ व्या स्थानावर आहे.