संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण-२ पुणे शाखेने खोट्या व बनावट खरेदी बिलांचा वापर करून करचोरी करणाऱ्या मे. व्ही. व्ही. कार्पोरेशन या व्यापाऱ्यावर विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केल्याची माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे.
अन्वेषण कारवाईमध्ये मे. व्ही. व्ही. कार्पोरेशनचे मालक प्रभाकर वेणू यांनी अस्तित्वात नसलेल्या व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खोटी व बनावट देयके प्राप्त करून कर चोरी केल्याचे उघडीस आले असून सुमारे ३४ कोटी ८२ लाख रुपयांची प्रत्यक्ष मालाची खरेदी न करता खोटी व बनावट खरेदीची बिले घेऊन ६ कोटी २६ लाख रुपयांची करचोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वस्तू व सेवा कर चोरी निष्पन्न झाल्याने मे. व्ही. व्ही. कार्पोरेशन या कंपनीचे मालक प्रभाकर वेणू यांना महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ मधील तरतुदीनुसार आणि अन्वेषणाच्या विशेष कार्यवाही अंतर्गत कलम १३२ (१) (क) अन्वये अटक करण्यात आली असून मुख्य न्याय दंडाधिकारी पुणे यांनी आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वस्तू व सेवाकरचे अपर राज्यकर आयुक्त धनजंय आखाडे, राज्यकर सहआयुक्त (नोडल-२ पुणे) दिपक भंडारे, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण-२ पुणे) मनिषा गोपाळे-भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहायक आयुक्त भारत सूर्यवंशी, सतिश लंके व सचिन सांगळे आणि राज्यकर निरीक्षकांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने आजपर्यंत अटकेसह एकूण विविध मोठ्या प्रकरणात ११ अटक केल्या आहेत. राज्य वस्तू व सेवा कर विभागातर्फे अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे वस्तू व सेवा कर विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.