बावधनमधील शिंदेनगर येथे फोटो स्टुडिओला भीषण आग
पुणे - बावधनमधील शिंदेनगर येथे आज सायंकाळी ५.५२ वाजता एका पाच मजली इमारतीतील फोटो स्टुडिओला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड, वारजे, पाषाण, औंध आणि एरंडवणा येथून अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली.
फोटो स्टुडिओमध्ये फ्लेक्स, फोटो फ्रेम आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या आगीच्या झळा इमारतीतील तीन सदनिकांपर्यंत पोहोचल्याने मोठे नुकसान झाले आहे.
इमारतीत साचलेल्या धुरामुळे आत अडकलेल्या ७ नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवले आहे. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ६.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असून दलाकडून घटनास्थळी अजूनही काम सुरू आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.