पर्वतीमध्ये उमेदवारीसाठी जातीय गणिताचा आधार?

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लवकरच लागू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे शहरातील विविध मतदारसंघांमध्येदेखील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Vidhansabha Election 2024

पर्वतीमध्ये उमेदवारीसाठी जातीय गणिताचा आधार?

सर्वत्र लागले ‘आमचं ठरलंय... पर्वतीत एक मराठा लाख मराठा’चे फलक

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लवकरच लागू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे शहरातील विविध मतदारसंघांमध्येदेखील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पर्वती मतदारसंघातदेखील महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगली आहे. कोणी आपण केलेल्या कामाचा दाखला देत आहेत तर, कोणी पक्षातील अनुभवाचा. तर, कोणी जातीचे कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. पर्वती मतदारसंघात ‘आमचं ठरलंय... पर्वतीत एक मराठा लाख मराठा’ अशा आशयाचे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत.

 हे फलक नेमके लावले कोणी अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. जातीचा आधार घेऊन उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा नेमका कोण प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात दौरा झाला होता. त्यावेळी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी पर्वती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काही इच्छुकांनी स्वत:चे छायाचित्र असलेले मनोज जरांचे यांचे स्वागत करणारे फलक सातारा रस्ता, सहकारनगर, पर्वती आणि बिबवेवाडी परिसरात लावले होते. त्यावरदेखील ‘एक मराठा लाख मराठा’ असे नमूद करून त्यामागे विधानसभेचे छायाचित्र लावण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेकडून (उबाठा) इच्छुक असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा आणि राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेविकेचा समावेश होता. जरांगे यांचे फलक विशेष करून महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी लावल्याचीदेखील चर्चा त्यावेळी मतदारसंघात रंगली होती. आता त्याचाच पुढील भाग नव्याने लावण्यात आलेल्या फलकांच्या रूपाने पाहायला मिळत आहे.

पर्वती मतदारसंघात दलित, मुस्लीम, मराठा, ओबीसी आणि ब्राह्मण समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. यासोबतच त्यामध्ये आता मारवाडी, जैन आणि गुजराती यांचीदेखील भर पडली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक १९७८ मध्ये झाली होती. त्यावेळी जनता पक्षाचे सुभाष सर्वगौड निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, कॉंग्रेसकडून वसंत चव्हाण, शरद रणपिसे, रमेश बागवे हे आमदार झाले. यातील रणपिसे आणि बागवे हे दलित समाजातील आमदार होते. त्यानंतर, भाजपाकडून दलित समाजातीलच दिलीप कांबळे, विश्वास गांगुर्डे हे उमेदवारदेखील विधानसभेवर निवडून गेले होते. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या खुल्या प्रवर्गातील आहेत. त्या सुरुवातीला सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकून आल्या होत्या. सलग तीन ‘टर्म’ त्या आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटलेला असतानाच पुण्यातही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. यापूर्वी पुण्यात झालेला विशाल मराठा क्रांती मूक मोर्चा राज्यात चर्चेचा विषय बनला होता. यासोबतच मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी पुण्यात आंदोलनेदेखील झाली आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा आदी मराठा संघटना, विचारवंत, ‘थिंकटॅंक’ यांचा पुण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. जरांगे यांनी वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास उमेदवार उभे करून महायुतीचे पर्यायाने भाजपाचे उमेदवार पाडणार असल्याचे वारंवार जाहीरपणे बोलून दाखवले आहे. त्याचीच पार्श्वभूमी हे फलक लावण्यामागे असावी, असा कयास बांधला जात आहे.

महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यामध्ये प्रमुख स्पर्धा आहे. मात्र, हे दोघेही मराठा नाहीत. तिसरे इच्छुक उमेदवार राजेंद्र शिळीमकर हे मराठा आहेत. महाविकास आघाडीमधील इच्छुकांमध्ये कॉंग्रेसचे आबा बागुल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या अश्विनी कदम, शिवसेनेचे (उबाठा) बाळासाहेब ओसवाल, सचिन तावरे हे इच्छुक आहेत. यातील बागूल, कदम हे दोघे ओबीसी आहेत. ओसवाल हे जैन आहेत, तर तावरे मराठा आहेत.

महायुती, मविआतील इच्छुकांमध्ये प्रत्येकी एक मराठा

महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुकांमध्ये प्रत्येकी एक मराठा इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे हे फलक या दोघांपैकी नेमके लावले कोणी, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनामधील प्रमुख चेहऱ्यांपैकी कोणी हे फलक लावले आहेत का, याचीही चर्चा सुरू आहे. निवडणुका म्हटल्या की ‘शह-काटशह’ आलेच. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी सर्व प्रकारची आयुधे वापरली जातात. निवडणुकीची आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नाही. रणमैदानाचे बिगुल फुंकले जाणे बाकी आहे. त्याआधीच जातीय समीकरणांचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हा प्रयत्न नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो आणि कोणाचे नुकसान करतो, हे आगामी काळातच समजेल.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest