वादग्रस्त अधिकाऱ्यांवर बार्टी उगारणार कारवाईचा बडगा
अमोल अवचिते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) एका कंत्राटी कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यासह एका कथीत पत्रकाराच्या विरोधात कोरगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बार्टीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून संबंधित वादग्रस्त अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसेच त्रयस्थ संस्था अथवा व्यक्तींकडून होणारी बदनामी थांबण्यासाठी कायदेशीर कारवाईचा इशारा बार्टीचे महासंचालक सुनीर वारे यांनी दिला आहे.
बार्टीतील वादामुळे अधिकारी, कर्मचारी तणावात आहेत. यावर महासंचालकांनी कठोर कारवाई करून कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय तयार करावा, अशी मागणी केल्याचे निबंधक इंदिरा अस्वार यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले.
मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. वादाने आमचे नुकसान होत आहे. बार्टीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच आपला कारभार सुधारावा अन्यथा खुर्च्या खाली कराव्यात. असे जनहित संघर्ष सेनेचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.
बार्टीवर तसेच संबंधित महिला अधिकाऱ्यावर आरोप केल्यानंतर त्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी पुरावे सादर केले नाहीत. ज्या अधिकाऱ्यांनी बार्टीची गुप्त माहिती बाहेर पुरवली किंवा कसे याची चौकशी होणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी बार्टी काम करते, त्याच पध्दतीने काम सुरू राहील. बार्टीचा मूळ उद्देश सोडून इतर कटकारस्थानांना स्थान नाही.
- सुनील वारे, महासंचालक, बार्टी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.