बार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; गुप्त माहिती पुरवून मानहानी केल्याचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) सावळा गोंधळ सुरु असून बार्टीच्याच एका कंत्राटी कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यासह एका कथित पत्रकाराच्या विरोधात कोरगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बार्टीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 31 Aug 2023
  • 02:55 pm
BARTI

संग्रहित छायाचित्र

कनिष्ठ कर्मचाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात पोलिसांकडे धाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) सावळा गोंधळ सुरु असून बार्टीच्याच एका कंत्राटी कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यासह एका कथित पत्रकाराच्या विरोधात कोरगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बार्टीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

बार्टीचे विभागप्रुमख सत्यद्रनाथ चव्हाण यांच्यासह एका साप्ताहिकाच्या संपादक आणि उपसंपादकाच्या विरोधात प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी तक्रार दाखल केली आहे. ‘सुमेध थोरातसारखे दलाल कुन्हाडीचा दंडा गोतास काळ’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बातमीमध्ये ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार यांनी आपली अस्मिता असलेल्या कोरेगाव भीमा शौर्य स्तंभ जागेच्या कागदपत्रात खाडाखोड करून रोहन माळवदकरला मदत केलेली आहे. तसेच बार्टीमध्ये फुले, शाहू, आंबेडकरी विचारानुसार काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांनी आरएसएसचा अजेंडा राबविण्यावर भर दिलेला असतानाही आर्थिक हव्यासापोटी सुमेध थोरातसारखे दलाल विविध आंबेडकरी पक्ष संघटनांमध्ये इंदिरा अस्वार यांची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या विरोधात केलेल्या कामांचे आमच्याकडे पुरावे असल्याने सुमेध थोरातसारख्या दलालांनी कुऱ्हाडीचा दंडा गोतास काळ ठरू नये,’’ असे वक्तव्य पत्रकार गौतम भंडारे आणि तक्षशीला महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता गाडगे यांनी केले आहे. तसेच ही बातमी करण्यासाठी बार्टीचे अधिकारी चव्हाण यांनीच मार्गदर्शन केले. यामुळे माझी बदनामी होत आहे. असा आरोप तक्रारदार सुमेध थोरात यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना केला.

 ‘‘बार्टीमध्ये ज्या बैठका होतात, ज्या चर्चा होतात, त्या बाहेर जाणे आपेक्षित नसताना चव्हाण यांच्या माध्यमातून त्या पुरवल्या जातात. त्यामुळे गुप्तता पाळली जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारची चर्चा न करता सात्ताहिकातील बातमीतून बदनामी केली जात आहे. त्यामुळे शेवटी पोलिसांकडे जावे लागले,’’ असे सुमेध थोरात यांनी सांगितले. बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या वादाबाबत महासंचालकांना विचारण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

‘‘बार्टी अनुसूचित जाती आणि बौद्धांच्या प्रगतीसाठी कार्य करीत आहे. मात्र भ्रष्टाचार आणि वादामुळे बार्टी बदनाम होत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश अशा वादांमुळे मागे राहत असून तिसऱ्याचाच फायदा होत आहे. महिला अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. महासंचालकांनी याबाबत ठाम भूमिका घेणे महत्वाचे आहे,’’ असे स्टूडंट हेल्पिंग हँडसचे अध्यक्ष अॅड. कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.

बार्टीच्या निबंधकांनी बार्टीमध्ये काळे काम केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. सरकारने दिलेल्या योजना राबिवण्याऐवजी त्या बंद पाडल्या जात आहेत. कोरगाव भीमा प्रकरणाच्या फाईलमध्ये त्यांनी खाडाखोड केली आहे. तसेच अनेक गैरप्रकार केले आहेत. त्याचे पुरावे असल्यानेच त्यांना पदावरुन दूर करण्यासाठी आता पर्यंत तीन वेळा आंदोलने केली आहेत. त्यांना सहकार्य केल्याने सुमेध थोरात यांच्या विरोधात वृत्त प्रकाशित केले होते.

 - गौतम भंडारे, संबंधित साप्ताहिकाचे संपादक

सुमेध थोरात हे माझे कनिष्ठ सहकारी आहेत. ते बार्टीकडे कंत्राटी सेवक म्हणून काम करतात. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. माझा आणि संबंधित बातमी करणाऱ्या पत्रकाराचा आणि साप्ताहिकाचा संबंध नाही. साप्ताहिकाच्या मार्गदर्शकपदी नाव टाकल्याने मी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करुन त्यावर चर्चा केली जाणार आहे.

- सत्यद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख, बार्टी

गौतम भंडारे हे कोणतीही शहानिशा न करता बार्टीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध वैयक्तिक आरोप करून बदनामीकारक बातम्या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये छापत आहेत. याबाबत कार्यालयाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे यापूर्वी तक्रार दाखल केली आहे. त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

 -  इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest