PMC News : थकबाकीदारांच्या २०२ मालमत्तांचा लिलाव; ५७ कोटी रुपये होणार तिजोरीत जमा

महापालिकेच्या मिळकत (PMC Pune)कर आकारणी आणि कर संकलन विभागाने (Tax Collection Department) थकबाकीदार मिळकतधारकांना झटका देत मालमत्ता थेट सील करण्याचे धोरण अवलंबले आहे. पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता आता विकण्याचा निर्णय घेतला असून या मालमत्तांच्या लिलावामधून कोट्यवधी रुपयांचा कर पालिकेला मिळणार आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 17 Oct 2023
  • 11:53 am
PMC News

थकबाकीदारांच्या २०२ मालमत्तांचा लिलाव

चालू वर्षात १४४२ कोटींच्या मिळकत कराची वसुली

लक्ष्मण मोरे/ अमोल अवचिते

महापालिकेच्या मिळकत (PMC Pune)कर आकारणी आणि कर संकलन विभागाने (Tax Collection Department) थकबाकीदार मिळकतधारकांना झटका देत मालमत्ता थेट सील करण्याचे धोरण अवलंबले आहे. पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता आता विकण्याचा निर्णय घेतला असून या मालमत्तांच्या लिलावामधून कोट्यवधी रुपयांचा कर पालिकेला मिळणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात २०२ मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यामधून पालिकेच्या तिजोरीत ५७ कोटी रुपये जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील या लिलावानंतर दुसरा टप्पादेखील राबविला जाणार आहे. दरम्यान, चालू वर्षात पालिकेला मिळकत करामधून १,४४२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न दोन हजार कोटींच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासोबतच नव्याने कर आकारणी  करण्यावरही भर देण्यात आला आहे. दोन वर्षात पालिकेने जवळपास ९२ हजार नवीन मिळकतींना ५३० कोटींची कर आकारणी केली आहे. यामधील २२५ कोटी रुपयेच जमा करण्यात यश आले आहे. अनेकदा विविध कारणे देत पुणेकर कर भरण्याबाबत उदासीनता दाखवितात. त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅन्ड वाजविला जातो. तर, कधी नोटीस बजावली जाते. तरी देखील व्यवस्थित कर भरला जात नाही. त्यामुळे, पालिकेकडून कर वसुली करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मिळकत कर विभाग प्रमुखांनी खात्यातील विभागीय पेठ निरीक्षकांना थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक पेठ निरीक्षकाला दर दिवशी १ म्हणजे प्रत्येकाकडून महिन्याला किमान ३० व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यासोबतच विभागीय निरीक्षक आणि पेठ निरीक्षक यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्वांनी मिळून किमान ५० मिळकती सील कराव्यात असे अपेक्षित आहे.

मात्र, सील कारवाई करताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. काही मिळकतींच्या बाबत न्यायालयात खटले सुरू असल्याने त्यामध्येही अडचणी आहेत. तरीही, दररोज १५ ते १७ मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच, मिळकत कर विभाग प्रमुखांनी बांधकाम व्यावसायिकांकडून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काही काळाने का होईना उत्पन्न वाढेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात १,४४२ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट मिळकत विभागाच्या अद्याप दृष्टिक्षेपात आलेले नाही. समाविष्ट गावांतील नागरिकांकडून  मिळकत कर भरण्याकडे कल वाढलेला नाही. त्यांच्याकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच, व्यावसायिक मिळकतधारकदेखील कर भरण्यात हात आखडता घेत आहेत. महापालिका येत्या काळात अभय योजना राबविल अशी आशा ते बाळगून आहेत. मात्र, प्रशासन अद्याप तरी अभय योजना राबविण्याच्या विचारात नसल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेकडून मिळकत कराची आणि थकबाकीची वसुली करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. थकबाकीदारांच्या घरापुढे तसेच कार्यालयांपुढे बँड वाजविले जातात.

 यासोबतच प्रत्यक्ष मालमत्तांना सील ठोकले जाते. मिळकतींवर बोजा चढविला जातो. मिळकतधारकांशी संवाद साधूनही कर वसुली केली जाते. यासोबतच, थकबाकीदारांना दरमहा दोन टक्के दंडाची देखील आकारणी केली जात आहे. या दंडाची रक्कम दिवसेंदिवस फुगत चालली असून त्यामुळेच ही थकबाकी वसूल होत नसल्याचे सांगितले जाते. अधूनमधून थकबाकीदारांना संधी म्हणून अभय योजनेसारख्या सवलतीच्या योजना आणल्या जातात. या सर्व उपाययोजनांनंतर देखील थकबाकीचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लाखो रुपयांचा कर थकवणाऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष कर थकविण्याऱ्यांचीच संख्या अधिक आहे. महापालिकेने कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डिजिटल प्रक्रियेद्वारे कर भरणा अधिक सोपा झाल्याने अनेक जण याच माध्यमाचा वापर करून कर भरतात. शासनाच्या नवीन निर्णयामुळे मिळकतधारकांना दिली जाणारी ४० टक्क्यांची सवलत रद्द झाली होती. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज भरून देण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

चार वर्षातील एकूण उत्पन्न

वर्ष               उत्पन्न

२०१८-१९ ११८५.२७

२०१९-२० १२६२.९५

२०२०-२१ १६६४.१५

२०२१-२२ १८४०.९२

२०२२-२३ १९७४.९५

२०२३-२४ १४४२.९१


वर्षानुसार नव्याने कर आकारणी झालेल्या मिळकती

वर्ष       मिळकती रक्कम

२०१८-१९ २४,३०६ १८९.०७

२०१९-२० ३९,६३८ २५४.७४

२०२०-२१ ४२, ७५४ ३६३.३८

२०२१-२२ ४७,१६७ ४०७.८३

२०२२-२३ ७०,००० ४००

२०२३-२४ २२,००० १३० 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest