तृतीयपंथियांकडून पोलिसांना मारहाण
पुणे : ओळखीच्या तरुणासोबत झालेल्या तृतीयपंथियांच्या वादाचे पर्यावरण थेट पोलीस चौकीत जाऊन तोडफोड करण्यापर्यंत झाले. यातील तृतीयपंथी आरोपींनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कात्रज पोलीस चौकीमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृतीयपंथी रोहित पवार (वय २६), सुरज कांबळे (वय १९), अजय अहिवळे (वय २४), राणी पाटील (वय २६), मयूर राव (वय २४, सर्व रा. खोपडे नगर, कात्रज), अल्फिया उर्फ लंगडी, खुशबू, आकाश यांच्यासह दहा तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी केतन विष्णू लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सर्व तृतीयपंथी आहेत. त्यांची आणि सनी नावाच्या एका ओळखीच्या तरुणाची पैशांवरून भांडणे झाली होती. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. सनी याला पकडून त्यांनी पोलीस चौकीत आणले. पोलिसांच्या मागोमाग सर्व तृतीयपंथी कात्रज पोलीस चौकीमध्ये गेले. त्या ठिकाणी मोठमोठ्याने शिवीगाळ करून टाळ्या वाजवीत पोलीस चौकीत गोंधळ घातला.
'सनी याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याचा मर्डर करणार आहोत' असे म्हणत चौकीतील रजिस्टर आणि टेबलचे नुकसान केले. तसेच, सनीला मारण्यासाठी आतल्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोखंडे आणि अधिकाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या सर्वांनी शिवीगाळ करीत लोखंडे यांच्या गणवेशाची कॉलर पकडली. त्यांना जोरात ढकलून देत गालावर बुक्की मारून नखांनी ओरबाडत जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.