संग्रहित छायाचित्र
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर), नाशिक फाटा, भोसरी, आळंदी रास्ता कार्यालय व दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक येथील कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा १२ जुन रोजी दुपारचा मुक्काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर असल्याने येथे नियमितपणे होणारे वाहन तपासणी व अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज आणि १२ जून रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनधारक आणि उमेदवारांची वाहन तपासणी किंवा चाचणी १७ जून रोजी होईल.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी १२ जुन रोजी जुना पुणे-मुंबई रस्ता- नाशिक फाटा या मार्गे पुण्याकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था येथे येण्या-जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने अनुज्ञप्ती चाचणीसाठी अर्जदारांना आयडीआर येथे पोहोचण्यास गैरसोय निर्माण होऊ शकते. अनुज्ञप्ती चाचणीसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीडीआर) येथील १२ जुन रोजी पूर्वनियोजीत वेळ घेतलेल्या उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी १७ जुन रोजी उपस्थित रहावे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी १४ जुन रोजी पुणे येथून सासवडकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी हडपसर-सासवड मार्ग वाहतूकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी १४ जुन रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनांची दिवे ता. पुरंदर येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तपासणी होऊ शकणार नाही. अशा वाहनधारकांनी त्यांची वाहने १४ जुन पासून पुढील सात दिवासांमध्ये कोणत्याही दिवशी तपासणीसाठी दिवे येथे सादर करावीत.
वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.