सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कलम १४४ लागू; १०० मीटर परिसरात जमावबंदी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University) मागील काही दिवसांमध्ये एसएफआय आणि अभाविपमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विद्यापीठ परिसर राजकीय आखाडा बनला होता. (Article 144 ) त्याच्या परिणाम स्वरूप विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाने पोलिसांकडे या ठिकाणी निर्बंध घालण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाचा विचार करून पुणे पोलिसांनी पुणे विद्यापीठाच्या परिसरात कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पुणे विद्यापीठाच्या १०० मीटर परिसरामध्ये जमावबंदी करीत विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासोबतच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हा आदेश विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाही असे देखील नमूद करण्यात आलेले आहे.
यासोबतच विद्यापीठ परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यावर देखील निर्बंध घालण्यात आलेले आहेत. विद्यापीठ परिसरात कोणताही आक्षेपार्ह, दोन गटात वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास अगर छापील मजकूर चिकटवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हा आदेश २१ नोव्हेंबर पर्यंत लागू करण्यात आलेला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे आदेश सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शतशृंगी पोलीस ठाण्याला पत्र पाठविले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशातील नामांकित विद्यापीठ आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विद्यापीठामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणास पूरक, सौहार्दपूर्ण आणि शांततामय वातावरणाची आवश्यकता असते. गेल्या काही दिवसात विद्यापीठाच्या बाहेरील व्यक्ती आणि संघटना यांनी विद्यापीठाच्या अथवा पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय मोर्चा, आंदोलने, निदर्शने केली. विद्यापीठाच्या आवारामध्ये या आंदोलनांचे आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती विविध प्रकारच्या वंदनांचे देखील आयोजन करण्यात आले. हे सर्व करत असताना विद्यापीठा बाहेरील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर आमंत्रित करण्यात आले.
या जमावाने भाषणे करीत घोषणा दिल्या. सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. शैक्षणिक वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात व्यक्त निर्माण झाला. अनेक वेळा त्याचे परिवर्तन भांडणे आणि मारामारी इत्यादीमध्ये झालेले आहे. या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी व एफआयआर दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक, सौहार्दपूर्ण आणि शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने विद्यापीठाच्या आणि त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध लावणे जरुरी असल्याचे विद्यापीठाने दिलेल्या पत्रात म्हटलेले होते. त्याच्यावर पोलिसांनी प्रतिसाद देत आदेश निर्गमित केलेले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.