परभणी, बीड प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करा; काँग्रेस नेते रमेश बागवे यांची मागणी
परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा, अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते, काँग्रेस नेते रमेश बागवे यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बुधवारी (दि. १८) धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल, असा इशारा बागवे यांनी दिला. या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी केली. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही. तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते. यावेळी अंकल सोनवणे, अरुण गायकवाड, रमेश सकट, कार्याध्यक्ष, पुणे शहर, विठ्ठल थोरात, मिलिंद अहिरे, दयानंद अडागळे उपाध्यक्ष पुणे शहर, राजश्री अडसूळ, महिला अध्यक्ष पुणे शहर, रवी पाटोळे, सुरेखा खंडाळे अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.