Pune : 'एनआयए'कडून पुणे पोलिसांचे कौतुक, पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केले 'एप्रिसिएशन'

पोलिसांनी कोथरूडमध्ये कारवाई करीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेमुळे देशभरातील दहशतवादी हल्ल्यांचा मोठा कट उधळला गेला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 6 Nov 2023
  • 09:30 pm

'एनआयए'कडून पुणे पोलिसांचे कौतुक, पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केले 'एप्रिसिएशन'

पुणे : पोलिसांनी कोथरूडमध्ये कारवाई करीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेमुळे देशभरातील दहशतवादी हल्ल्यांचा मोठा कट उधळला गेला. या दहशतवाद्यांनी देशभरात मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला करण्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले आहे.  पोलिसांच्या या कारवाईची दाखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात 'एनआयए'ने पुणे पोलिसांचे आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे विशेष कौतुक केले आहे. तसे पत्र एनआयएने पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. 'पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे 'इसिस मॉड्युल' उघडकीस आले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती यंत्रणांच्या हाती लागली. ही कारवाई अत्यंत महत्वाची आहे. त्याबद्दल पुणे पोलिसांचे आणि आपले अभिनंदन' असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलिसांच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचारी १९ सप्टेंबर २०२३ रोजी  रात्र गस्तीवर असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३ ) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मोहम्मद शाहनवाज शफिउर रहमान आलम (रा. पेलवल रोड, न्यू महमूदा हाऊस, कटकमसंडी, हजारीबाग, झारखंड) हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याला नुकतीच एनआयएने दिल्लीमधून अटक केली आहे. खान, साकी आणि शाहनवाज यांना पकडण्यात आले होते. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्रे आणि त्यांनी सांगितलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोंढव्यात ते रहात असलेल्या घराची झडती घेतली होती. त्यांच्याकडून 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेच्या देशविघातक कट कारस्थानांचा पर्दाफाश झाला होता. पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० जीबीचा डाटा, धार्मिक आणि कट्टरतावादी साहित्य जप्त केले होते.  

त्यामध्ये पुण्यातील छाबड हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीन शॉट देखील आढळून आले होते. त्यांच्याकडून टेन्ट जप्त करण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये प्रवास केला असून त्यांची पाहणी केल्याचेही समोर आले. कोल्हापूरच्या आंबोली जंगलात ते राहिले होते. पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील जंगलात त्यांनी स्फोटके पुरून लपवून ठेवलेली होती. येथे त्यांनी बॉम्बची चाचणी देखील केली होती. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे सर्किट, ड्रोन हे देखील जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या शाहनवाजचा शोध सुरू करण्यात आला होता.  हा तपास पुढे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. एटीएस ने एकूण पाच जणांना अटक केली होती. यापूर्वी या गुन्ह्यात आतापर्यंत कातिल दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर (वय ३२, रा. कोंढवा), मॅकॅनिकल इंजिनीअर असलेल्या सीमाब नसरुद्दीन काझी (वय २७, सध्या रा. कोंढवा), झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, जि. ठाणे), तनीश नासीर सिद्दीकी, जुबेर नुर मोहम्मद शेख आणि शर्जील शेख, डॉ. अदनान अली सरकार याला अटक करण्यात आलेली आहे. 'एनआयए'च्या तपासात फरार झालेल्या शाहनवाजला अटक केली आहे. 'एनआयए'ने या पुणे पोलिसांच्या कामगिरीची दखल घेत पत्र पाठवित अभिनंदन केले आहे. अशा प्रकारचे पत्र पहिल्यांदाच पुणे पोलिसांना आलेले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest