गदिमांच्या ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन
ग. दि. माडगूळकर लिखित ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन् डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला.
‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते.
या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत वर्षा जोगळेकर यांनी काम केले. नाट्यपदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली.
या कार्यक्रमामध्ये सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी केले. तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे, निनाद जाधव यांची संगीत साथ लाभली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.