संग्रहित छायाचित्र
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये असे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस असेल. जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.