Israel-Hamas War : इस्राएल-हमास युद्धाची पुण्यात परतलेल्या कृषिशास्त्रज्ञ स्वप्नील काजळेंनी सांगितली आपबीती...

अडकलेल्या एकूण १८,००० भारतीयांत मुख्यत्वे वृद्धांची काळजी घेणारे केअर टेकर्स आणि विद्यार्थी, इस्राएलमधील हिंसाचाराच्या छायेतून मातृभूमीत नुकतेच सुखरूप पुण्यात परतलेल्या कृषिशास्त्रज्ञ स्वप्नील काजळेंनी सांगितली आपबीती...

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 20 Oct 2023
  • 10:58 am
Israel-Hamas War

पुण्यात परतलेल्या कृषिशास्त्रज्ञ स्वप्नील काजळेंनी सांगितली आपबीती...

दयानंद ठोंबरे 

इस्राएल-हमास युद्धाला (Israel-Hamas War)आता आठवडा उलटून गेला आहे. या युद्धाच्या बातम्या आणि हिंसाचाराबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे. हिंसाचारावेळी प्रत्यक्ष इस्राएलमध्ये कार्यरत असणारे भारतीय कृषिशास्त्रज्ञ स्वप्नील काजळे (Swapnil kajale) हे नुकतेच पुण्यात दाखल झाले असून ‘सीविक मिरर’ शी साधलेल्या संवादात त्यांनी तिथे अनुभवलेली परिस्थिती  केली कथन.        

"वेळ सकाळी सहा ते साडेसहाची. सारखे सायरनचे आवाज येत होते. त्यावरून कळले की खूप मोठी दुर्घटना किंवा आपत्ती आल्याची जाणीव झाली आणि भीतीची चाहूल लागली. हमास या दहशतवादी संघटनेने इस्राएलवर हल्ला केल्याचे कळले," अशी प्रतिक्रिया नुकतेच इस्राएलवरून पुण्यात सुखरूप परत आलेले  कृषिशास्त्रज्ञ स्वप्नील काजळे (वय ३५) यांनी ‘सीविक मिरर’ जवळ प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राहणारे शास्त्रज्ञ स्वप्नील काजळे रविवारी सायंकाळी दिल्लीमार्गे पुणे येथे दाखल झाले. ते सध्या वडगाव शेरी येथील त्यांचे सासरे दीपक माळवे यांच्याकडे पत्नी व दोन मुलांसोबत आहेत. सासूरवाडीत फटाके वाजवून त्यांचे औक्षण करण्यात आले. 

इस्राएल-हमास युद्धाला दोन आठवडे  झाले आहेत. भारताचे १८ हजार नागरिक इस्राएल येथे आहेत. युद्धजन्य परिस्थितीत भारत सरकारने आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ ही मोहीम राबवली. आतापर्यंत या मोहिमेदरम्यान झालेल्या फेऱ्यांमधून अनेकांना मायदेशी आणण्यात भारत सरकारला यश आले आहे. 

स्वप्नील काजळे हे इस्राएल येथील रिशाॅन लेर्झीऑन या शहरात वास्तव्यास होते. ॲग्रीकल्चर रीसर्च ऑर्गनायझेशन व्होलकॅनी इन्स्टिट्यूट (मिनिस्ट्री ऑफ ॲग्री) यांचे रीसर्च सेंटर आहे. या संस्थेच्या सात शाखा या ठिकाणी आहेत. तेथे काजळे हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गेली दीड वर्ष ते या ठिकाणी आहेत. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी सांगितले की, इस्राएल वेळेनुसार सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहापासून दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली. म्युझिक फेस्टिवल सुरू होता तेथे पहिला हल्ला झाला. मोटराइज्ड पॅराशूटने हल्ला केला.  पाच हजार मिसाईल डागले गेले. गाझा बॉर्डरपासून हल्लेखोरांनी टनेलमधून प्रवेश घेतला. या म्युझिक फेस्टिवलमध्ये निरनिराळ्या देशातील नागरिक सहभागी होते. आम्ही राहात असलेल्या रिशाॅन या शहरापासून ७०-८० किलोमीटरवर हे फेस्टिवल  चालले होते त्या ठिकाणी हल्ला झाला होता. सुकोथ हा सण आहे. तो आठवडाभर साजरा केला जातो. २९ सप्टेंबरपासून या सणाला सुरुवात झाली होती. या सणाचा हा शेवटचा दिवस होता.  शुक्रवार (६ ऑक्टोबर) ज्यू लोकांचा शब्बाथ  होता. याच दिवशी दहशतवादी हल्ला झाला. काजळे पुढे म्हणाले की, रिशाॅन येथे दीड मिनिटांनी मिसाईल येण्याची शक्यता असते, तर गाझा येथे १५ सेकंदात मिसाईल येऊ शकते. इस्राएलमध्ये इमारतींना शेल्टर सक्तीचे केले आहेत. याच्यावर मिसाइलचा काहीही परिणाम होत नाही. सायरन वाजल्यानंतर मात्र सर्वजण सावध होतात. तसेच दूतावासाकडून सगळ्यांना सावधानतेचा इशारा दिला जातो. फेसबुक, वेबसाईटवर त्याबाबत सूचना दिली जाते. इस्राएलमध्ये वृद्धांची काळजी घेणाऱ्या केअरटेकर संस्थांची संख्या जास्त आहे. तसेच पीएचडी, मास्टर करणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीयांना मायदेशी परत नेण्यासाठी भारतीय दूतावासाने नोंदणी करायला सांगितले होते. २४ तास हे काम चालू होते. दिल्लीत आल्यानंतर महाराष्ट्र सदनमधील राजेश हरणे या प्रतिनिधीने मोठी 

मदत केली असल्याचे काजळे यांनी आवर्जुन सांगितले.

"तिथून आल्यानंतर आपापल्या शहरी जाण्यासाठी विमानाचे बुकिंग झाले नसलेल्यांची महाराष्ट्र सदनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. इस्राएलमध्ये आम्ही तीन साथीदार एका रूममध्ये राहात होतो. त्यापैकी दोघांना परतीचे मेल आले होते, पण मला मेल आला नव्हता. त्यामुळे मी एकटा तेथे होतो त्यामुळे भीती वाटत होती. ज्याला मेल येत असत तसे ते मायदेशी परतत होते. नोव्हेंबरमध्ये एका कार्यशाळेसाठी चीनला जायचे होते," असेही काजळे यांनी सांगितले. 

"अजूनही ते आशावादी आहेत. हा संघर्ष शांततामय सामोपचाराने संपेल असे त्यांना वाटते. स्वप्नील काजळे पुण्यात परतल्यानंतर त्यांची पत्नी प्रियांका यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हा दहशतवादी हल्ला एवढा वाढेल असे वाटले नव्हते. इस्राएलमध्ये राहिले असल्याने तशी भीती वाटत नव्हती, पण मैत्रिणींनी सांगितल्यानंतर भीती वाटू लागली. त्यांचे दोन मित्र भारतात परतल्यानंतर हे तिकडे एकटेच राहिले असल्याने जास्त काळजी वाटू लागली. हे सुखरूप आल्यामुळे देवाचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest