संग्रहित छायाचित्र
पुणे शहरामध्ये पावसाळयामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता लवकरात लवकर उपाययोजना करा. वाहतूकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढा, अशा सुचना पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बुधवारी पोलीस आयुक्तायात रितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपुर्व तयारीचे अनुषंगाने संबंधित स्वायत्त संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पोलीस आयुक्त, पुणे शहर आयुक्त, पुणे मनपा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा, स्मार्ट सिटी, महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., पी.डब्ल्यु. डी., कॅन्टोन्मेंट बोर्ड, पी. एम. पी. एम. एल. कडील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पुणे शहरामध्ये पावसाळयामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता, सर्व संबंधित स्वायत्त संस्थांचे कार्यालयामध्ये कंट्रोल रुम तयार करण्यात येणार असून यांचेकडील सर्व विभागचे अधिकारी यांचा व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळयामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांचेकडून अतिरिक्त वॉर्डन वाहतूक शाखेस पुरविण्याबाबत आयुक्त, पुणे मनपा यांनी आदेश दिले आहेत.