लाखमोलाच्या खिल्लारी बैलजोडीची झाली चोरी
नितीन गांगर्डे
शेतकऱ्याची एक लाख रुपये किमतीची खिल्लारी बैलांची जोडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरूर परिसरात कर्डे गावात रविवारी पहाटे हा प्रकार घडला.
शेतकरी असलेल्या देवराम जाधव (वय ७०) या वृद्धाची बैलजोडी चोरीला गेली आहे. त्यांचे या बैलजोडीवर जीवापाड प्रेम होते. ही बैलजोडी कुटुंबातील सदस्यच असल्याची त्यांची भावना होती. तेच चोरीला गेल्याने दुःख झाले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
देवराम जाधव यांचा मुलगा संदीप (वय ३८) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात बैलजोडी चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत चोरीला गेलेल्या बैलजोडीचा शोध घेत असल्याचे सांगितले. मागील पंधरा दिवसात या गावातून जनावरांची चोरी झाल्याची ही पाचवी घटना आहे. आसपासच्या गावातही जनावरे चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
नुकतीच बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यानंतर जाधव या शेतकऱ्याचे बैल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. त्या अनुषंगाने हे बैल बैलगाडा शर्यतीसाठी चोरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदीप जाधव हे पुणे शहरात महावितरणमध्ये अभियंता या पदावर आहेत. ते पुणे शहरातच राहतात. गावी त्यांचे आई-वडील दोघेच असतात. त्यांची गावी १५ एकर शेती आहे. संदीप यांचे आई-वडीलच शेती कसतात. शेतीतील बरेचशी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने करत असले तरी, आपल्या प्रगतीत बैलांचा मोठा वाटा असल्याने देवराम जाधव यांना बैलांचा लळा आहे.
संदीप हे सुट्टीच्या दिवशी गावाला जात असतात. नेहमीप्रमाणे ते रविवारी घरी गेले होते. त्यांच्या घरी दोन कामगार आहेत. घराच्या मागे बैलांसाठी गोठा बांधला आहे. त्यांच्याकडे फक्त दोन बैल आहेत. शेतीच्या किरकोळ कामासाठी त्यांचा वापर करतात. एरवी ते घरातच बसून असतात. शेतातील कामे करण्यासाठी ते ट्रॅक्टरचा वापर करतात. देवराम जाधव यांना बैलाने शेती करण्याची आवड आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वी हे बैल घेतले होते. त्यांना मुलांप्रमाणे ते जीव लावत होते. दिवस-रात्र त्यांची काळजी घेत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी रविवारी रात्री एक वाजता झोपेतून उठून त्यांना कडबा खायला टाकला. त्यानंतर ते पुन्हा जाऊन झोपले. पहाटे पाच वाजता उठून पुन्हा एकदा बैलाला खायला टाकायला गेले असताना गोठ्यात दोन्ही बैल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या कासऱ्याने बैल बांधले होते. तो कासरा अलगद सोडून ठेवण्यात आला होता. तो कापला नव्हता, तोडलाही नव्हता. चोरणाऱ्यांनी बैलांचा कासरा सोडून त्यांना गोठ्यातून चालत घेऊन गेले.
चोरी झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बैलांचा शोध घेण्यासाठी परिसरातील चार-पाच ठिकाणचे सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने त्यात स्पष्ट काहीच दिसले नाही. ‘‘सीसीटीव्हीमध्ये काही आढळून आले असते तर आतापर्यंत या चोरांचा शोध घेता आला असता,’’ असे पोलिसांनी सांगितले.
जाधव यांचे घर शेतात आहे त्यांच्या घराजवळ इतर वस्ती नाही. घराच्या चहुबाजूंनी ऊस आहे. त्यामुळे त्यांच्या घराजवळ चोरट्यांनी गाडी आणली नसावी. घराला लागून जवळच डांबरी रस्ता आहे. त्या ठिकाणी काही अंतरावर चारचाकी वाहन उभे करून बैलांना गाडीपर्यंत चालवत नेले आणि नंतर गाडीत टाकून बैलांची चोरी केली असण्याची शक्यता आहे. असे तपास अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण यांनी सांगितले.
शेती कसण्यासाठी बैलांचा मोठा आधार आहे. आम्ही आतापर्यंत त्यांच्या कष्टावरच शेती केली आहे. ते आम्हाला मुलाप्रमाणेच आहेत. आम्ही शेतकरी असल्याने या बैलांचा आणि आमचा संबध फक्त कामापुरता नाही. त्यांच्याशी आमचे एकदम घट्ट भावनिक नाते आहे. ते चोरीस गेल्यापासून आम्हाला अन्न गोड वाटेनासे झाले आहे.
- देवराम जाधव, बैलजोडीचे मालक