कंपनी मालकाचे अपहरण करीत उकळले लाखो, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल
पुणे : कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करीत असलेल्या माजी कर्मचाऱ्याने पाठलाग करून मालकाला जबरदस्तीने गाडीत बसवीत पुरंदर येथील निर्जनस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप काढून घेत अकाउंट वरून जबरदस्तीने पाच लाख रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच, चेकद्वारे २४ लाख रुपये जबरदस्तीने घेण्यात आले. ही घटना खराडीवरून मांजरीकडे जाणाऱ्या जॅकवेल पुलाजवळ ४ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमंत विठ्ठल शिरसाठ (वय २९), श्रीकांत यशवंत पवार, श्रीधर सयाजी साळुंखे (वय २८), जयश्री अजिंक्य कुरणे (वय ३९), वर्षा रमेश माने (वय २२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संतोष शिवाजी पवार (वय ३२, रा. सैनिक नगर, मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष पवार यांच्या कंपनीमध्ये हनुमंत शिरसाट हा कन्सल्टंट म्हणून काम करत होता. पवार आणि त्याच्यात आर्थिक मतभेद झाले. त्यानंतर तो कंपनीमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने पवार यांचा पाठलाग केला. त्यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. त्यानंतर स्वतःच्या गाडीमध्ये बसवले आणि त्यांचा मोबाईल काढून घेतला. पुरंदर येथील निर्जन टेकडीवर त्यांना नेण्यात आले. मारण्याची धमकी देऊन त्यांचा मोबाईल व लॅपटॉप घेऊन शिरसाट याच्या कंपनीच्या अकाउंटवर पाच लाख रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच, चेकद्वारे २४ लाख रुपये जबरदस्तीने घेतले. अन्य आरोपी साळुंखे, कुरणे, माने यांनी पवार यांच्या कंपनीचा डाटा व अतिशय महत्त्वाची कागदपत्रे चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कागदपत्र आणि डाटाचा वापर करून नवीन कंपनी काढण्यात आली. त्या आधारे ग्राहकांबरोबर काम करीत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.