Lure of income from 'shares' : 'शेअर'मधून उत्पन्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमधून चांगले पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करून एका व्यक्तीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सिंहगड रस्त्यावरील रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजीनगरच्या सायबर पोलीस विभागात तक्रार दाखल केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 19 May 2023
  • 01:10 am
'शेअर'मधून उत्पन्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

'शेअर'मधून उत्पन्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

यूट्यूब चॅनेलद्वारे जास्त परतावा िमळवून देण्याची खोटी मािहती देऊन लुटणाऱ्यास राजस्थानमधून अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शेअर मार्केटमधून चांगले पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करून एका व्यक्तीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सिंहगड रस्त्यावरील रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजीनगरच्या सायबर पोलीस विभागात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भाग असलेल्या राजस्थानातील एका आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मिलन जिनेंद्र जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोिव्हडच्या काळातील लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली. अनेकांच्या नोकऱ्या, काम थांबले असल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली. अशातच घरात बसून मोकळा वेळ मिळत असल्याने तक्रारदार काहीतरी उद्योगधंदा शोधत होते. या परिस्थितीमधील नागरिकांची गरज ओळखून त्यांना लालूच दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या. असे चोरटे समाजमाध्यमातून नागरिकांना घरबसल्या चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी ते आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेल्या नागरिकांना आपले लक्ष्य करत होते. त्यांना भरपूर परतावा देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात अडकवत होते. 

घरबसल्या मुबलक पैसे मिळवून एका क्लिकसरशी सगळ्या आर्थिक समस्यांचे निराकरण करता येऊ शकते असा खोटा विश्वास देऊन घरबसल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा सल्ला असे सायबर चोरटे देत होते. त्याला बळी पडून नागरिकही गुंतवणूक करत होते. याच परिस्थितीचा फायदा घेऊन राजस्थानमधील सायबर गुन्ह्यांचे आगार समजले जाणाऱ्या अलवर जिल्ह्यातील आरोपी मिलन जिनेंद्र जैन (रा. केदलगंज वर्कशॉप) याने २०२० मध्ये शेअर मार्केटबाबत माहिती देणारे यूट्यूब चॅनल सुरू केले. या माध्यमातून सुरुवातीच्या काळात सर्वसामान्य लोकांना शेअर मार्केटचे धडे देऊन त्यातून कसे पैसे कमवायचे हे दाखवून चॅनलचे सबस्क्रायबर वाढवले.

आरोपीने आपल्या यूट्यूब चॅनलचे ४० हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर लोकांना त्याची स्वतःची 'ट्रेडिंग विंथ ए प्रो' नावाची कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे आमिष तो नागरिकांना दाखवत होता. त्यासाठी तो त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. अशाच प्रकारे त्याने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एका ज्येष्ठ नागरिकाची २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याने त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

फिर्यादी यांनी आरोपी जैनचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. सुरुवातीच्या काळात फिर्यादीने गुंतवलेल्या रकमेस चांगला परतावा देऊन आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी मिलन याच्या 'ट्रेडिंग विथ ए प्रो' या कंपनीच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यावर वेळोवेळी तब्बल २५ लाख रुपये भरायला लावले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने त्यांची फसवणूक केली. आरोपी मिलनने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील लोकांचीही लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्या विरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातदेखील फसवणुकीचा आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. 

रबाळे पोलिसांनी आरोपीला राजस्थान येथून अटक केली होती. गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपी मिलन जिनेंद्र जैन याला पुणे सायबर पोलिसांनी  तळोजा जेल येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने २२ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील यांनी 'सीविक मिरर'ला दिली

दरम्यान, सायबर चोरट्यांकडून महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे बँकेतून फोन आहे असे सांगून लुबाडणे, अश्लील संवाद किंवा चित्रफितीचा वापर करणे आदी मार्गींनी नागरिकांकडून पैसे लुबाडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest