महापालिकेच्या वतीने वाकड येथील ५ एकर जागेत सहा मजली शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. या शाळेच्या आवारात क्रीडांगण विकसित करणे, सीमा भिंत बांधणे, टर्फ कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट बांधण्यात येणार आहे. तसेच, पार्किंगची व्यवस्था आदी स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे. शाळेत फर्निचरही केले जाणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
वाकड येथील आरक्षण क्रमांक ४ /२३ येथील ५ एकर जागेत महापालिकेने इंग्रजी माध्यम शाळेसाठी सहा मजली भव्य इमारत बांधली आहे. त्यातील ७ गुंठे जागेत बॅडमिंटन हॉल बांधण्यात येत आहे. उर्वरित जागा ही पूर्णपणे शाळेसाठी आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. शाळेच्या आवारात क्रीडांगण बांधणे, टर्फ कोर्ट टाकणे, फुटबाल व व्हॉलीबॉलचे कोर्ट तयार केले जाणार आहे. पार्किंगची सोय केली जाणार आहे. सीमा भिंत बांधली जाणार आहे. स्थापत्यविषयक इतर कामे करण्यात येणार आहेत.
शाळा इमारत आणि वर्ग खोल्यात फर्निचर केले जाणार आहे. त्या कामासाठी २० कोटी ५६ लाख ८ हजार ३१४ रूपये खर्चाची निविदा स्थापत्य 'ड' मुख्यालयाने काढली होती. त्याला तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. तर, एसएस साठे इन्फ्रा. प्रा. लि. या ठेकेदाराची ४.५ टक्के कमी दराची १९ कोटी ६६ लाख ७२ हजार ३७९ रूपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्या कामाचा कालावधी १२ महिने आहे. या खर्चास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.