संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे-मुंबई-ठाणे-नाशिक आदी मोठ्या शहरांसह राज्यात सर्वत्र ‘हेल्मेट सक्ती’ लागू केली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे दुचाकी चालक आणि दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या प्रवाशांचे होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रभावीपणे हेल्मेट कारवाई करण्याच्या सूचना राज्याच्या वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्व आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांना दिल्या आहेत. यासोबतच दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेला प्रवासी यापैकी कोणाच्याही डोक्यावर हेल्मेट नसल्यास त्याची वेगवेगळी दंड आकारणी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात हेल्मेट कारवाईचा बगडा वाहतूक पोलिसांकडून उगारला जाण्याची शक्यता आहे.
वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने अधीक्षक साळवे यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या या पत्रानुसार, महाराष्ट्रामध्ये मागील पाच वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसून प्रवास करणारे प्रवासी यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांच्या मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. यासोबतच मोटर व्हेईकल कायदा १९८८ चे कलम १२८ आणि १२९ च्या तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व प्रवासी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. तसेच, मोटर व्हेईकल कायदा १९८८ चे कलम १२८ आणि १२९ ची प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, वाहतूक केसेस करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या ‘ई चालान’ मशिनमध्ये आवश्यक बदल करून घेण्यात यावेत. त्यामध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि विना हेल्मेट प्रवासी अशा दोन्ही केसेसची कारवाई एकाच हेडखाली न करता वेगवेगळी कारवाई केली जावी. त्याकरिता ‘ई चालान’ मशिनमध्ये मोटर व्हेईकल कायदा कलम १२९/१९४ (ड) या शिर्षकामध्ये बदल करण्यात आल्याचेर देखील कळवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे दोन वेगवेगळे हेडखाली कडक व प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अपघाती मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या कमी होण्यास मदत होईल असेही नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे आगामी काळात पुण्यात वाहतूक पोलीस हेल्मेट कारवाई वाढविण्याची शक्यता आहे. पुण्यात नेहमीच हेल्मेट सक्तीविरोधात आंदोलने उभी राहिलेली आहेत. पुणेकरांनी अनेकदा ही हेल्मेट सक्ती उधळून लावली होती. आता नव्याने होऊ घातलेल्या सक्तीला पुणेकर कसे तोंड देणार याकडे लक्ष लागले आहे.