पुण्यातील १५ रस्ते आता 'व्हीआयपी'
केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यावरच रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करणाऱ्या पुणे महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. त्यामुळे पुणे महापालिका आता शहरातील १५ प्रमुख रस्त्यांकडे व्हीआयपी रस्ते म्हणून पाहणार आहे. या रस्त्यांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती आणि सुशोभीकरणही होणार आहे.
पुण्यातील जी-२० परिषदेदरम्यान रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. विशेषत: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाहुणे ज्या रस्त्यांवरून जाणार आहेत त्यांचा यामध्ये समावेश झाला होता. केवळ दाखविण्यासाठी महापालिका हे काम करत असल्याची टीकाही झाली होती. त्यामुळे आता १५ रस्त्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
व्हीआयपी रस्त्यांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या रस्त्यांचा यामध्ये प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुभाजक तयार करून रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रस्त्यालगतच्या भिंतींनाही रंगरंगोटी करण्यात येणार आहे. दुभाजकांनाही पुन्हा रंगरंगोटी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चौकांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
बाणेर रस्त्यावरील रहिवासी गायत्री क्षीरसागर म्हणाल्या, 'महापालिकेने भिंती आणि दुभाजक रंगवण्यावर नव्हे, तर खड्ड्यांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. मूलभूत कामांना प्राधान्य दिले पाहिजे. पालिका अधिकाऱ्यांचे बाणेरकडे दुर्लक्ष होत आहे.'
अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, 'मिशन १५ रोडमधील रस्त्यांची निवड ही आदर्शपणे केलेली आहे. हे मुख्य रस्ते असून, शहरातील बहुतांश वाहतूक याच रस्त्यावरून होते. त्यामुळेच त्यांना व्हीआयपी रस्ते असे म्हटले आहे. यातील सोलापूर रस्ता आणि नगर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सुशोभीकरणाच्या कामासाठी ४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.'
हे आहेत १५ व्हीआयपी रस्ते
पर्णकुटी चौक ते वाघोली-बकोरी फाटा - नगर रस्ता
वानवडी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक - सोलापूर रस्ता
मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौक - मगरपट्टा रस्ता
पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण, बावधन सर्कल चौकापर्यंत - पाषाण रस्ता
पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक - बाणेर रस्ता
सीओईपी चौक ते पर्णकुटी चौकापर्यंत - संगमवाडी रस्ता
पुणे विमानतळ ते गुंजन चौकापर्यंत - विमानतळ रस्ता
खंडोजीबाबा चौक ते वारजे चौकापर्यंत - कर्वे रस्ता
पौड फाटा ते चांदणी चौक - पौड रस्ता
स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक - सातारा रस्ता
लक्ष्मीमंदिर चौक ते नांदेड सिटी चौक - सिंहगड रस्ता
पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौक - बिबवेवाडी रस्ता
कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते ताडीगुत्ता चौक
सीओईपी चौक ते पुणे विद्यापीठ चौक - गणेशखिंड रस्ता
स्वारगेट चौक ते सिमला ऑफिस चौक हेरिटेज वॉकसाठी बाजीराव रस्ता व शिवाजी रस्ता
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.