पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी - चंद्रकांत पाटील

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 31 May 2023
  • 03:36 pm
 पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय सुनील फुलारी पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.

वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस विभागाकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस विभागाने निःपक्षपणे तपास करुन सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला विषयक प्रकरणे, जातीय तंटे आदी प्रकरणे जलदगतीने तपास केला पाहिजे. गुन्हा घडूच नये यासाठी सदैव सावध असले पाहिजे. वेल्हा तालुकाच्या विकासासाठी मागणीप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.

पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, जुने पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज सन २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Share this story

Latest