संग्रहित छायाचित्र....
वडगाव मावळ | सोमाटणे फाटा येथील टोलनाका बंद व्हावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व माजी नगरसेवक अरूण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात काय म्हटले आहे...
निवेदनात म्हटले आहे की, "सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीवर देहूरोड असे छापले जाते. या टोलनाक्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दोन टोलनाक्यांमधील अंतर ६० किलोमीटर असायला हवे असा नियम असताना वरसोली व सोमाटणे या ३२ किलोमीटरच्या अंतरात दोन टोलनाके कसे?
टोल वसूल करीत असताना स्थानिक गावकऱ्यांसाठी सेवा रस्त्याची आवश्यकता असते. याठिकाणी सेवा रस्ता नाही. रुग्णवाहिका जाण्यासाठी स्वतंत्र सोय नाही. लोणावळ्यापासून ते निगडी पर्यंत चार पदरी रस्ता आहे व गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली होत आहे. ही वसुली केव्हाच पूर्ण झाली आहे, तरीही दुरुस्तीच्या नावाखाली मुदतवाढ दिली जाते.
तरी देखील टोलनाका राजरोसपणे सुरु....
आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनामध्ये हा टोलनाका बंद व्हावा म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. २०२२- २३ मध्ये टोल नाका बंद व्हावा म्हणून स्थानिक नागरिकांनी व स्वर्गीय किशोर आवारे यांनी उपोषणाच्या मागनि आंदोलन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलनाका बंद होईल असे आश्वासन दिले होते. मावळचे तहसीलदार यांनी टोलनाका बेकायदेशीर असल्याचे लेखी पत्र शासनाला दिले. तरी देखील टोलनाका राजरोसपणे सुरु आहे. यावर त्वरित कारवाई करून जनतेला या झिझिया करातून व वाहतूक कोंडीतुन सोडवावे,’ अशी विनंती निवेदनातून केली आहे.