महाविकास आघाडीकडून भोसरी शिवसेनेला; अजित गव्हाणेंना उमेदवारी नाही, रवी लांडगे संभाव्य उमेदवार?

आमदार होण्यासाठी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्या पदरी निवडणुकीपूर्वीच निराशा पदरात पडण्याची चिन्ह आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आमदार होण्यासाठी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्या पदरी निवडणुकीपूर्वीच निराशा पदरात पडण्याची चिन्ह आहेत. त्याला कारण म्हणजे महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यामुळे भोसरीत लांडगे विरुद्ध लांडगे अशी लढत होऊ शकते.

सध्या सर्वत्र बंड आणि पक्षांतराच्या उड्या सुरू आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असणारे अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा लढवण्यासाठी शरदचंद्र पवार गटात तर भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला. रवी लांडगे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेत महाविकास आघाडीकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करू, अशी ग्वाही दिली होती, तर गव्हाणे हेच भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार असतील असे सांगितले जात होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाने इच्छुक सर्व उमेदवारांची बैठक घेत मुलाखत घेतली. यावेळी पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना एकत्र बसवले होते. यावेळी भोसरी आणि चिंचवडमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवत विजयी झाल्यावर सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याची आठवण करून देण्यात आली. तर पिंपरी विधानसभेत सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा आग्रह शहर पातळीवरील नेत्यांनी धरला.

सर्वांसमक्ष भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ एक प्रकारे आपल्याला नको, असा सूर सर्वच नेत्यांनी आवळल्याने गव्हाणे यांची नाराजी बैठकीत दिसून आली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर पातळीवरील नेते आपल्याला चिंचवड आणि भोसरी नको म्हणत असल्याने गव्हाणे यांची कोंडी झाली आहे.

दुसरीकडे चिंचवडमधून बंडाच्या तयारीत असलेले नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांचीही कोंडी झाली आहे. सध्या काटे आणि भोईर हे महायुतीत आहेत. मेळावे आणि फ्लेक्स लावत बंडाचे निशाण फडकवणारे नेते केवळ वातावरण निर्मिती करीत असल्याचे आता कार्यकर्ते बोलू लागले आहेत. भाजपला वाहून घेतलेले कुटुंब म्हणून रवी लांडगे आणि परिवाराकडे पाहिले जाते. यामुळेच रवी लांडगे २०१७ मध्ये महापालिकेत बिनविरोध नगरसेवक झाले होते. तर पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची एकहाती सत्ता असतानाही आपली वेगळी ओळख जपत भाजपमधून नगरसेवक झालेले शीतल उर्फ विजय शिंदे हे चिंचवडमधून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. शिंदे यांची बंडखोरी अद्याप किती दिवस टिकते हे नक्की नाही. परंतु, रवी लांडगे यांनी पक्षांतर केल्याने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट स्वतःहून आपल्याला भोसरी नको म्हणत असल्याने ही जागा शिवसेनेला सोडून येथून महाविकास आघाडीकडून रवी लांडगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधून विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी इच्छुक नसल्याने युतीत तरी बंडखोरी होण्याची शक्यता नसल्याने महायुतीचे महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे रवी लांडगे असा सामना भोसरी विधानसभेत पाहायला मिळू शकतो. दरम्यान, या सगळ्या वावड्या असून अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित नसल्याने उमेदवार ठरणे बाकी असल्याचे सर्वच पक्षांचे नेते सांगत आहेत.

भोइरांची तलवार म्यान
शांत, स्वच्छ आणि सुंदर चिंचवड आता बकाल झाले असून, इथल्या सत्ताधाऱ्यांना आमदारकी केवळ, टीडीआर आणि टेंडरमध्ये घोटाळे करण्यासाठी हवी असल्याचा आरोप भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेतून करीत बंड केले होते. मात्र, भोईर यांचे बंड थंड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील १० दिवस भोईर शहरातून गायब झाल्याचे चित्र असल्याने त्यांनी बंडाची तलवार म्यान केली का, अशी चर्चा आता चिंचवड विधानसभेत सुरू झाली आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story