शहरात २७ ठिकाणी विजयादशमी पथसंचलन
पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी (दि. ६) विजयादशमी कार्यक्रम पार पडला. तसेच, १९ ठिकाणी १२ व १३ सप्टेंबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रहित, शक्तिसंचयन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते.
या वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील २७ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर १२ ऑक्टोबर रोजी विविध भागात पथसंचलनाचेही आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे. रविवारी देहू, भैरवनाथ चौक, निगडी येथील यमुनानगर, चिखलीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृह, टाऊन हॉल, सांगवीत पंडित दीनदयाळ उपाध्याय मनपा शाळा, कासारवाडीत ज्ञानेराज माध्यमिक शाळा मैदान, पिंपळे गुरव रामकृष्ण मंगल कार्यालयात, नवी सांगवी येथील संस्कृती मंगल कार्यालय, पिंपळे निलख, विशालनगर या ठिकाणी विजयादशमी साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर १३ ऑक्टोबरला पिंपळे सौदागरमध्ये बाळासाहेब कुंजीर मैदान, काळेवाडी - रहाटणी येथे ज्योतिबा उद्यान वाहनतळ, पवनानगर पिंपरीमध्ये नव महाराष्ट्र विद्यालय, चिंचवड येथे जिजाबाई गावडे उद्यान, मोरया गोसावी क्रीडा संकुल , रावेतमध्ये शुभम गार्डन, वाकडमध्ये रिलायन्स मॉल समोर, पुनावळे मध्ये बालाजी विद्यापीठ, थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल रोड, मैदान, हिंजवडी ब्ल्यू रिच पब्लिक स्कूलजवळ तर, आकुर्डीत सावरकर मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.