Pimpri Chinchwad: पिंपरीत डीप मेगाब्लॉक!

पुणे-मुंबई जुन्या राष्ट्रीय महामार्गावर थेट १२ किलोमीटरचा रस्ता बंद करताना याची कोणतीच पूर्व कल्पना नागरिकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळा, कॉलेज आणि नोकरी-कामधंद्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे पिंपरी-चिंचवडकर

पिंपरीत डीप मेगाब्लॉक!

सखोल स्वच्छ अभियानासाठी परस्पर बंद केला ग्रेड सेपरेटर, नागरिक चार तास वाहतूक कोंडीत, पालिकेचा कोंडी झाला नसल्याचा दावा

पुणे-मुंबई जुन्या राष्ट्रीय महामार्गावर थेट १२ किलोमीटरचा रस्ता बंद करताना याची कोणतीच पूर्व कल्पना नागरिकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळा, कॉलेज आणि नोकरी-कामधंद्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे पिंपरी-चिंचवडकर वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. (Pimpri Chinchwad Traffic News)

नागरिकांना गृहीत धरून मुख्य मार्गच बंद केल्याने शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरदेखील सकाळी मोठी कोंडी झाली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांबरोबर एसी केबिनमध्ये बसून बैठक घेत याचे उत्तम नियोजन केले होते. मात्र, याची कल्पना रस्त्यावरून प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्यांना सामान्यांना द्यावी हे बैठकीच्या अजेंड्यावर नव्हते. त्यामुळे महापालिका आणि पोलीस या दोघांपैकी एकानेही याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली नाही.

सकाळी पाच वाजता या विशेष मोहिमेसाठी निश्चित केलेली वाहने आणि महापालिकेचे कर्मचारी सात वाजता नियोजित ठिकाणी आले. पोलीस बंदोबस्त सकाळी पाचपासून तैनात करण्यात आला होता. ग्रेड सेपरेटरच्या सर्व इन आऊट जवळ (वाहन प्रवेश आणि बाहेर पडण्याचे ठिकाण) एक पोलीस कर्मचारी आणि दोन वॉर्डन नियुक्त करण्यात आले होते. परंतु, सेवा रस्त्यावरील वाहने अडकून पडल्याने निगडी ते दापोडी ठिकठिकाणची सिग्नल यंत्रणा बंद करून पोलिसांना वाहतूक नियमन करावे लागले.

जुन्या-पुणे मुंबई महामार्गावर शहराच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारावर दापोडी ते निगडी असा दुतर्फा ग्रेड सेपरेटर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून  बांधला आहे. एकूण १२ किलोमीटरच्या या मार्गात पिंपरी, मोरवाडी, चिंचवड, आकुर्डी येथे ग्रेड सेपरेटर (समतल वितलग) आहे. या एकूण मार्गाला भक्ती-शक्ती उड्डाणपुलापासून नाशिक फाटा आणि सीएमईपर्यंत जाताना केवळ दोन सिग्नल आहेत. त्यामुळे विनाथांबा थेट दापोडी ते निगडी असा जलद प्रवास करता येतो.

मात्र, शासनाच्या आदेशामुळे अचानक जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सकाळी रहदारीच्या वेळेत थेट हा रस्ताच बंद करून टाकला होता. पिंपरी, मोरवाडी, चिंचवड, आकुर्डी येथे ग्रेड सेपरेटर (समतल वितलग) मध्ये क्षमतेपेक्षा उंच वाहन गेल्यास कंटेनर अडकण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. त्यामुळे एखाद्या ठराविक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. क्रेन आणून ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत होते.

परंतु शुक्रवार हा दिवस असल्याचे समजून, महापालिकेने धुलीकरण कमी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेल्या वाहनांमधून पाण्याचा फवारा करीत निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून रस्ता धुण्यास सुरुवात केली. परिणामी हा रस्ता बंद करून पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहने सेवा रस्त्यावरून सोडण्यात येत होती.

पिंपरी-चिंचवडमधील वाहनसंख्या  सध्या २६ लाखांवर गेली आहे. त्यातच मुंबईकडून जुन्या महामार्गाने पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहनेदेखील कोंडीत अडकली होती. राज्य आणि केंद्र सरकारच्या सूचनांनुसार सध्या ठिकठिकाणी स्वच्छ्ता अभियान हाती घेण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवडमधील ५३ मंदिरे आणि १७ प्रमुख रस्त्यांची स्वच्छ्ता केली जाणार आहे. १४ जानेवारीपासून सुरू झालेला हा प्रकार येत्या २१ जानेवारीपर्यंत महापालिकेकडून सुरू ठेवला जाणार आहे.

मी नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडलो आणि आकुर्डी चौकात आलो. रोज मला या अडीच किलोमीटर प्रवासासाठी ५ ते ७ मिनिटे लागतात. आज मी अवघ्या अडीच किलोमीटर प्रवासासाठी अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडलो. मला पुण्यात जायचं होते. इथेच अडकून पडल्याने मीटिंग रद्द करावी लागली. 

- शिरीष विसपुते, व्यावसायिक, निगडी प्राधिकरण

मला ठराविक आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी सकाळी लवकर पुणे शहरात जावे लागते. एकदा वेळ उलटून गेल्यावर ते औषध घेत येत नाही. आजच्या वाहतूक कोंडीमुळे मला औषध घेता आलेले नाही. प्रशासनाने पूर्वकल्पना दिली असती तर मी अन्य मार्गाने पुण्यात गेलो असतो. 

- सचिन साकोरे, व्यावसायिक, आकुर्डी

मुख्य मार्ग बंद करताना पूर्व कल्पना देणे प्रशासनाला गरजेचे का वाटत नाही. मी कॉलेजमध्ये वेळेत पोहचू शकले नाही. स्मार्ट सिटी यालाच म्हणतात का, असा आता प्रश्न पडतो आहे. 

- स्मिता जोशी, विद्यार्थिनी, चिंचवड.

स्वच्छ अभियानाचे (डीप क्लिनिंग) महापालिकेने नियोजन केले होते. त्यासाठी आम्ही आवश्यक कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर तैनात केले होते. मी स्वतः आणि दोन सहायक आयुक्त देखील रस्त्यावर उतरून नियोजन करीत होतो. अभियानाला सुरुवात होण्यास उशीर झाल्याने कोंडी झाली. परंतु, आम्ही संपूर्ण स्टाफसह रस्त्यावर असल्याने वाहतूक सुरळीत केली गेली. 

- विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा पिंपरी-चिंचवड

सखोल स्वच्छ अभियानासाठी रस्ता बंद करणार असल्याची पब्लिक नोटीस दिली होती. तसेच यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. सेवा रस्ता सुरू होता. दीड तासाच्या अंतराने टप्याटप्याने रस्ते बंद केले होते. कुणालाही यामुळे त्रास झाला नाही. 

- यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग महापालिका

Share this story

Latest