संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी तृतीयपंथी नागरिकांना महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आता विस्मरणात पडल्याने शहरातील मुख्य चौकांमध्ये तृतीयपंथी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या तृतीयपंथीकडून वाहनचालक, नागरिकांकडून पैसे मागितले जातात. वाहन अडवून, कारच्या काचा खाली घ्यायला लावून हे तृतीयपंथी वाहनचालकांकडून पैसे वसूल करतात. पैसे न देणाऱ्यांच्या वाहनासमोर उभे राहून टाळ्या वाजवत, तसेच इतर अश्लील हावभाव करत हे तृतीयपंथी नागरिकांना त्रास देत आहेत. त्यामुळे वाहनचालक, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Pimpri Chinchwad News)
तृतीयपंथी नागरिकांना (Third Gender Citizens) समाजात मानाचे स्थान मिळावे, काम करून पैसे कमवावे, पैशांसाठी भीक मागणे किंवा इतर कामे करू नयेत, यासाठी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी हा उपक्रम हाती घेतला होता. सुरुवातील अनेक तृतीयपंथी नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा त्यांचे लोकांकडून भीक मागणे, चौकात उभे राहण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. महापालिका व स्मार्ट सिटीकडून अनेक स्वप्न दाखवित, नवनवे प्रकल्प केल्याचे दावे केले जात आहेत. त्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटीला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. असे असले तरी, शहरातील अनेक चौकात भिकारी, तृतीयपंथीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चौकातील सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांजवळ जाऊन जबरदस्तीने भीक मागितली जात आहे. काही वेळेस थेट वाहने थांबवून पैसे वसुल केली जाते. त्यासाठी जबरदस्ती केली जाते. प्रसंगी अश्लिल हावभाव केले जातात. अंगाला हात लावणे, कारची काच पुसणे असे प्रकार केले जातात. अपेक्षित पैसे न दिल्यास शिवीगाळ केली जाते. त्यावरून अनेकदा वादही झाले आहेत.
तृतीयपंथी व भिकारी अचानक वाहनासमोर येत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे. वाहनचालक तसेच, ये-जा करणार्या पादचार्यांकडूनही पैसे मागतले जातात. हे मंडळी दिवसभर चौकात वावरत असल्याने तेथे कचरा करतात. त्यामुळे चौक अस्वच्छ होत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे वाहनचालकांसह नागरिक वैतागले आहेत.
कारवाई करावी
चौकांतील तृतीयपंथींकडून वाहन चालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहनात कुटुंब किंवा एखादी महिला बसलेली असल्यास तृतियपंथीच्या वागण्यामुळे मोठी लज्जास्पद परिस्थिती निर्माण होते. मोरवाडी चौक, पिंपरी चौक, चाकण चौक, तळवडे चौक , पवळे चौक अशा अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये या तृतीयपंथींची संख्या मोठी आहे. महापालिका आणि पोलिसांनी या प्रकारावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
विक्रेत्यांचाही त्रास...
तृतीयपंथी बरोबरच चौकांमध्ये लहान मुले आणि वयस्कर नागरिकांकडून भीक मागण्याचे प्रकार वाढले आहे. लहान मुले वाहनाच्या खिडकीला लटकून तसेच गाडीच्या पुढील भागावर उभे राहून वाहनचालकांकडून भीक मागतात. काचेवर पाणी मारून, आम्ही काच पुसली, पैसे द्या, अशी पैशांची मागणी करतात. तसेच सिग्नल लागल्यावर अनेक लोक पेन, कपडा, सॉक्स अशा वस्तू घेऊन वाहनासमोर येऊन विकू लागतात. त्यामुळेही अपघाताची शक्यता वाढली आहे.
चौकात थांबू नये, वाहन चालकांना त्रास देऊ नये, याबाबत तृतीयपंथी नागरिकांना पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येते. वेळप्रसंगी काही लोकांवर कारवाईही करण्यात आली आहे. वाहनचालकांच्या वाढत्या तक्रारी पाहून प्रत्येक चौकात संबंधित पोलिस ठाण्याला सांगून कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल.
- सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलिस
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.