विकास शिंदे
पिंपरी चिंचवड: दहा हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील पिंपरी चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प करुन त्यांचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. तरीही ४७ सोसायटीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. यापुढे सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह मैलाशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणीसाठी महापालिकेकडून खाजगी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे. याकरिता पर्यावरण विभागाने ३० जानेवारीपर्यंत कोटेशन मागविण्यात आले आहेत. (Pimpri Chinchwad News)
पिंपरी चिंचवड शहरातील किमान शंभर प्लॅट पेक्षा मोठ्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू ठेवणे बंधनकारक आहे. तरीही अनेक सोसायट्या ह्या सांडपाणी प्रकल्प बंद ठेवत असल्याचे पर्यावरण विभागाच्या तपासणी समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहेय याकरिता सोसायटींवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ३३१ मोठ्या सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची खासगी एजन्सीमार्फत पाहणी केली. तसेच सोसायट्यांच्या मैलाशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये २८४ सोयायट्यांमध्ये सांडपाणी प्रकल्प सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले. तर ४७ सोसायट्यात सांडपाणी प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सांडपाणी प्रकल्प बंद असणा-या सोसायट्यांना दोनदा नोटीस बजावण्यात आल्या. नोटीस मिळताच ६ सोसायट्यांनी सदरचा प्रकल्प तात्काळ कार्यान्वित केला. तर ४१ सोसायट्यांनी नोटीस मिळूनही हा प्रकल्प सुरु केलेला नाही. त्या सोसायट्यांना पर्यावरण विभागाने प्रकल्प सुरु करा, अन्यथा नळ जोडणी तोडण्यात येईल. असा इशारा दिला आहे.
दरम्यान, पर्यावरण विभागाने बजावण्यात आलेल्या नोटीसांना नागरिकांकडून कडाडून विरोध झाल्याने नळ कनेक्शन तोडणीची कारवाई तात्परुती स्थगित केलेली आहे. त्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सोसायट्यांमधील एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित राहावे, याकरिता खासगी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे दरपत्रक मागविण्यात आले आहे. 30 जानेवारीपर्यंत सील बंद पाकीटातील खासगी संस्थानी दर सादर करावेत, असं आवाहन पर्यावरण विभागाकडून केले आहे.
खाजगी संस्थेची हे राहणार कामकाज
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व मैलाशुध्दीकरण केंद्र नियमित सुरु रहावेत, याकरिता सोसायटीवर नजर ठेवण्यासाठी खाजगी सल्लागार एजन्सी सर्व खाजगी एसटीपीची प्रत्यक्ष भेट देणे, साप्ताहिक अहवाल पर्यावरण अभियांत्रिकी विभागाला सादर करणे, एसटीपी कार्यान्वित असल्याची माहिती मनपा संकेतस्थळावर अपलोड करणे, सोसायटीमध्ये योग्य क्षमतेचा एसटीपी आहे काय? एसटीपी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे. ज्या तंत्रज्ञानावर आधारीत आहे, त्यानुसार क्षमता योग्य आहे का? सोसायटीचे ड्रेनेज कनेक्शन मनपा ड्रेनेज लाईनला आहे का? एसटीपीमध्ये सांडपाण्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्रक्रिया करण्यात येते का? प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतो का? हे काम खाजगी सल्लागार संस्थेला करावे लागणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि मैलाशुध्दीकरण केंद्र नियमित सुरु ठेवणे हे मोठ्या सोसायट्यांना बंधनकारक आहे. तरीही काही सोसायट्या हा प्रकल्प बंद ठेवत असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सोसायट्यांचे एसटीपी कायमस्वरूपी सुरु रहावे. त्यांच्यावर योग्य नियंत्रण राहून वारंवार तपासणी व्हावी, म्हणून खाजगी सल्लागार संस्थेची नियुक्ती करणार आहे. याकरिता निविदा दरपत्रक मागविले आहे.
- हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका पिंपरी चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.