पिंपरी-चिंचवडकरांना मिळेना शुद्ध हवा
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: शहरात हवेतील धुलिकरण आणि डिझेल वाहनांच्या धुरांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुध्द हवा मिळावी म्हणून महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 'राष्ट्रीय स्वच्छ हवा' कार्यक्रमात हवा शुद्ध प्रणाली, ड्राय मिस्ट कारंजे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात येत आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामाची मुदत संपूनही हवा शुध्द प्रणाली, ड्रायमिस्ट कारंजे यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दररोज अशुध्द हवेतून श्वास घ्यावा लागत असून नागरिकांचे आरोग्य आणखी धोक्यात येवू लागले आहे. (Pimpri Chinchwad News)
पिंपरी-चिंचवड शहरात हवेची गुणवत्ता ढासळली असून, वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांना स्वच्छ व शुध्द हवा मिळावी म्हणून महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून शहरातील सहा ठिकाणी हवा शुध्द प्रणाली, १३ ठिकाणी ड्राय मिस्ट आधारित कारंजे प्रणाली, मोशी कचरा डेपोवर स्थिर धुके तोफ बसवण्यात येत आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागाने मे. हायटेक सर्व्हिसेस कंपनीला तब्बल २२ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपये खर्च करत हे काम दिले आहे.
पर्यावरण विभागाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात हवा शुद्ध प्रणालीत आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिक फाटा व भोसरी गाव या सहा ठिकाणी बसवली जात आहे. सभोतालची हवा स्वच्छ करण्यास आणि हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी ही यंत्रणा बसवली जात आहे. यामुळे हवेतील लीड, पारा, क्रोमियम, झिंक, कोबाल्टसारखे कण काढून टाकण्यास मदत होणार आहे. परंतू, सदरील हवा शुध्द प्रणाली यंत्रणा बसवूनही अद्याप सुरु झालेली नाही. तर ड्राय मिस्ट आधारित कारंजे प्रणाली यंत्रणा १३ ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मोरवाडी चौक, विसर्जन घाट चिंचवड, चिंचवड गाव चौक, रावेत भोंडवे चौक, मोशी गोडाऊन चौक, तळवडे चौक, चिखली आरटीओ चौक, एम.एम.स्कूल काळेवाडी, कोकणे चौक, नेहरू नगर चौक, नाशिक फाटा, रांका गॅस एजन्सी, चिंचवड, खंडोबा माळ, चौक या ठिकाणी हे ड्राय मिस्ट कारंजे प्रणाली बसवण्यात येत आहे. हे कारंजे तयार करताना उच्चदाब पंप आणि विशेष नोजल वापरुन धुके तयार करण्यात येत आहे. हवेतील धुलिकरणांना जड बनवून कमी करणे आणि जमिनीवर खाली आणण्यास मदत होणार आहे. हवेतील आर्द्रता व तापमान कमी करुन वातावरण थंड राहण्यासाठी हे कारंजे मदत करणार आहेत. ही ड्राय मिस्ट आधारित कारंजे प्रणाली देखील अद्याप सुरु झालेली नाही.
वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हवा स्वच्छ, शुद्ध होण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाची वेगवेगळी यंत्रणा कार्यान्वित करत आहे. परंतु, संबंधित मे. हायटेक सर्व्हिसेस ठेकेदार कंपनीला सहा महिने कामाची मुदत असताना देखील अद्याप हे काम पुर्ण केलेले नाही. महापालिकेने यापुर्वी देखील पिंपरी चौकात ११ जानेवारी २०२३ रोजी शहरातील हवेची गुणवत्ता दर्शवण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसवली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते.
हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण धुलीकरण, वाहनांचा धूर, हवेतील लहान मातीच्या कणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, दम लागणे आदी आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून बारीक धुलीकण हवेत मिसळत आहेत.
तसेच शहरात नवीन बांधकामे, सिमेंट रस्त्यांची कामे, आर.एम.सी प्लांट आदी सुरु आहे. यामुळे देखील धुळ वाढत आहे. परिणामी सध्या प्रदूषित हवेचा श्वास नागरिक घेत आहेत.
दरम्यान, मोशी कचरा डेपोवर देखील स्थिर धुके तोफ बनवली जात आहे. कचरा डेपोवरील धूळ आणि गंध नियंत्रणासाठी वॉटर मिस्ट यंत्रणेतंर्गत हे ह्यूमिडिपायर म्हणून वापरले जाणार आहे. हवेतील धूळ कमी करुन अग्नीशमनासाठी हे वापरता येणार आहे. ही तोफ पोर्टेबल व चाकांवर बसवलेली असून कोणत्याही ठिकाणी ओढत घेवून जाता येणार आहे. या तोफांचे देखील काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थिर धुके तोफ बनवण्याचे काम अपुर्ण राहिले आहे. संबंधित मे. हायटेक सर्व्हिसेस कंपनी ठेकेदाराला पालिकेकडून कामाचे आदेश १३ जून २०२३ रोजी देवून सहा महिन्यांत काम पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर कामाची मुदत संपूनही हे काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध हवा कधी मिळणार? असा सवाल उपस्थितीत होत आहे.
महापालिका पर्यावरण विभागाने हवा शुध्द प्रणाली सहा ठिकाणी बसवलेली आहे. त्यातील काही ठिकाणी चाचणी घेतलेली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणी ट्रायल सुरु आहे. येत्या चार-पाच दिवसांत ही हवा शुध्द प्रणाली सुरु होईल. तर ड्राय मिस्ट आधारित कारंजे प्रणालीचे काम अपुर्ण आहे. त्या तेरा ठिकाणी बसवण्यात येत आहेत. काही ठिकाणी बसवून पुर्ण झालेल्या आहेत. पण, अद्याप कुठेही सुरु झालेली नाही. त्या ड्रायमिस्ट कारंजे प्रणाली देखील लवकरच सुरु करण्यात येतील.
- हरविंदसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.