संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: आयटी हब हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा प्रमुख दुवा वाकड-दत्तमंदिर रस्ता (Wakad Datta Mandir Road) विकास आराखड्याप्रमाणेच विकसित केला जाईल. ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे. 'सीविक मिरर' ने या रस्त्याचे चुकीचे नियोजन आणि संशयास्पद आराखड्याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. ७ ऑगस्ट २०२२ रोजी 'रोगापेक्षा इलाज भयंकर' या शीर्षकाखाली 'सीविक मिरर' ने या विषयाला हात घातला होता. तर ३ जानेवारी 'नागरिक ४५ मीटर रस्त्यासाठी आग्रही' या शीर्षकाखाली या विषयाचा पाठपुरावा केला. याची दखल घेत प्रशासनाने नागरिकांची मागणी मान्य करत आराखड्यानुसारच रस्ता विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Pimpri-Chinchwad News)
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. संबंधित रस्ता ४५ मीटर रुंद होईल, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी २४ मीटर रुंदीचाच रस्ता वाहनचालकांच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे या भागातील एकूण २७ सोसायट्यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे आणि प्रतिनिधी यांच्यासोबत महापालिका आयुक्त शेखर सिंह व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिका भवनात घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते.
वाकड-दत्तमंदिर रोड रुंदीकरणाबाबत स्थानिक सोसायटीधारकांनी आक्षेप घेतले आहेत. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ४५ मीटर होणे अपेक्षित आहे. महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये असलेल्या वाकड- दत्तमंदिर रोडचे रुंदीकरण विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे होत नाही. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. त्याला प्रशासनाकडून अभय देण्यात येत असून, त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अगदी २४ मीटरपर्यंतच ठेवण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे विकास आराखड्यात मंजूर असलेल्या नियोजनाप्रमाणे सदर रस्त्याचे काम करावे, अशी परिसरातील सोसायटीधारकांची मागणी आहे.
दरम्यान, याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी सकारात्मक पुढाकार घेतला. त्यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी व सोसायटीधारक प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विकास आराखड्याप्रमाणे ४५ मीटर रस्ता करण्याबाबत सर्वतोपरी प्रशासन कार्यवाही करणार आहे. काही ठिकाणी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे.
वाकड-दत्त मंदिर रोड परिसरातील स्थानिक सोसायटीधारकांनी दत्त मंदिर रोड रुंदीकरणाबाबत नोंदवलेले आक्षेप रास्त आहेत. विकास आराखड्याप्रमाणे प्रशासनाने ४५ मीटर रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली.
- सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन
दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाबाबत स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत वारंवार चर्चा झाली आहे. त्यामुळे सोसायटीधारकांसोबत आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये विकास आराखड्याची अंमलबजावणी करून रस्ता रुंदीकरण करावे. या मार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली. याला आयुक्त शेखर सिंह व संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.