Pimpri Chinchwad News: दररोज पाणी नागरिकांसाठी स्वप्नच!

भामा-आसखेड धरणातील पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर जॅकवेलचे काम ४० टक्के झाले असून अशुद्ध उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाच वेळी पूर्ण

संग्रहित छायाचित्र

नागरिकांना दररोज पाण्यासाठी २०२५ उजाडणार?, भामा-आसखेडचे पाणी मिळण्यासाठी करावी लागणार आणखी दीड वर्षांची प्रतीक्षा

विकास शिंदे:
भामा-आसखेड धरणातील पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर जॅकवेलचे काम ४० टक्के झाले असून अशुद्ध उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाच वेळी पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत ही कामे पूर्ण होतील, त्यानंतरच पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दररोज पाणी हे किमान २०२५ पर्यंत नागरिकांसाठी स्वप्नच असणार आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. तर आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी शहरासाठी मंजूर करण्यात आले आहे. या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्‍टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे.

भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून होत आहे. त्यामुळे जागेचे भूसंपादन करण्यास अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढून कामाला गती दिली आहे. २६ किलोमीटरपैकी आत्तापर्यंत ९ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा अतिरिक्त आयुक्तांकडून दर महिन्याला आढावा घेतला जात आहे. २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, शहराला सध्य स्थितीत पवना धरणातून ५१० एमएलडी, आंद्रा धरणातून ७५ तर एमआयडीसीकडून २० असे ६०५ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तरीही शहरातील नागरिकांना पाणी कमी दाबाने व पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे दररोज पाण्यासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

शहरात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. मागील पाच ते सहा दिवस झाले कडक उन पडू लागले आहे. उन्हाचा चटका वाढू लागल्याने अनेक भागात पाण्याच्या तक्रारी वाढणार आहेत. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणी पातळी देखील झपाट्याने कमी होत असते. सध्यस्थितीत शहरात काही भागात तक्रारी आहेत.  दिवसाआड पाणी असले तरीही दोन दिवसाचे एकदाच मुबलक पाणी देत आहोत. पाणी पुरवठ्याची कामे वेगात सुरू आहेत. एक-दीड वर्षात कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता,  महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest