संग्रहित छायाचित्र
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सुधारण्यासाठी सक्षम या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण भारत मिशन (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रीडिंग इन प्रॉफिशियन्सी विथ अंडरस्टँडिंग ॲण्ड न्यूमरसी) या अंतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी सक्षम उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सक्षम उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांचे त्यांच्या शैक्षणिक स्तरांनुसार गट करून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. सक्षम उपक्रमांतर्गत, तीस हजारांहून अधिक विद्यार्थी सध्या लाभ घेत आहेत. महानगरपालिकेच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम उपक्रम राबवण्यात येत आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांच्या केलेल्या मूल्यांकनाच्या माहितीचा आधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर ठरवण्यासाठी व त्यांची गटामध्ये विभागणी करण्यासाठी घेण्यात आला. सक्षम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवणे व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रभावीपणे सक्षम केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरतेमध्ये वाढ होण्यासाठी सक्षम उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्येकी ४५ दिवसांच्या दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. सक्षम उपक्रमाचा पहिला टप्पा सध्या सुरू झाला असून, यामध्ये शाळेचे पहिले २ तास भाषेवर (६० मिनिटे) आणि गणितावर (६० मिनिटे) लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर चालू होणाऱ्या दुसरा टप्प्यामध्ये ४५ मिनिटे भाषेवर आणि पुढील ४५ मिनिटे गणितावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.