संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोशीच्या (Moshi) बोऱ्हाडेवाडी भागात आम्हाला घरे दिली. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची सोय नसल्याने कोणी पाणी देता का, पाणी अशी भीक मागण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे पाणी समस्या तातडीने दूर केली नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याची तयारीदेखील महिलांनी सुरू केली आहे. (Pimpri Chinchwad News)
महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशीतील बो-हाडेवाडी परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधली आहेत. या आवास योजनेत नागरिकांना घराचे वाटप करण्यात आले आहे, त्यानुसार या प्रकल्पात १४ मजली ६ इमारती असून त्यांचे नामांकन ए, बी, सी, डी, ई, एफ असे आहे. त्यात एकूण एक हजार २८८ सदनिकांचे वाटप केलेले आहे. या सदनिकांमध्ये सुमारे ५ ते ६ हजार नागरिक वास्तव्यास आले आहेत. (PCMC News)
पालिकेने नागरिकांना राहण्यास घरे बांधून दिली, पण त्याचबरोबर अन्य पायाभूत सोयी- सुविधादेखील उपलब्ध करून द्यायला हव्यात. मात्र, तेथील लाभार्थ्यांना दररोज विविध समस्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून मागील दोन महिन्यांपासून पाण्याची अडचण तीव्रतने जाणवू लागली आहे.
दोन दिवसांसाठी ७० हजार लीटर पाणी
महापालिका पाणी पुरवठा विभाग प्रतिमाणसी १३५ लीटर पाणी दररोज देते, त्यानुसार एका घरात ४ लोक असतील, तर साधारणपणे एका घराला ५४० लीटर पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे एका इमारतीला एक लाख १६ हजार ६४० लिटर पाण्याची गरज आहे. दिवसाआड पाणी पुरवठा असल्याने त्यांच्या दुप्पट पाणी द्यायला पाहिजे. परंतू, सध्या दोन दिवसांत ७० हजार लीटर पाणी दिले जात आहे. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांवर प्रचंड अन्याय होत असल्याची नागरिकाची भावना आहे. त्यामुळे एका दिवसाला तब्बल ७८ हजार ७५१ लीटर पाण्याचा तुटवडा भासत आहे. या स्थितीत सोसायटीतील नागरिकांना पाणी कसं पुरवणार, असा सवाल लाभार्थी विचारत आहेत. तेथील रहिवाशांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी टँकरने पाणी मागावे लागत आहे. नागरिकांना काम-धंदा सोडून बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांकडून पैसे जमा करून टँकरचे पाणी भरावे लागत आहे.
आयुक्तांनी तोडगा काढावा, अन्यथा हंडा मोर्चा
पंतप्रधान आवास योजनेतील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीमध्ये पाणीटंचाई वारंवार जाणवत आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांना ताबा देण्यापूर्वी पाणी पुरवठा उच्च दाबाने, पुरेसा मिळेल, याची खात्री करायला हवी होती, दिवसआड पाणी पुरवठा होत असल्याने या बहुमजली आवास योजनेतील सर्व घरांमध्ये पाणी पुरत नाही. दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत आहे. नागरिकांना काम-धंदा सोडून टँकरची वाट पाहावी लागत आहे. ही पाणी टंचाई दूर करून स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीचा पाणी प्रश्न आयुक्त शेखर सिंह यांनी दूर करावा, अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सारिका बोऱ्हाडे यांनी दिला आहे.
सोसायटीचा अर्ज नाही
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नळ जोडणीचे रितसर अर्ज केलेले नाहीत. आपल्या सोसायटीला एकच दीड इंचाचे नळजोड अधिकृत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नळ जोडणीसाठी रितसर अर्ज करून त्यांची आवश्यक रक्कम कोषागारात भरावी. त्यानुसार सोसायटीच्या मानकांनुसार नळजोड लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
- रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा, महापालिका पिपरी-चिंचवड