संग्रहित छायाचित्र
पिंपरी - चिंचवड: येथील पवना नदीपात्रात हाॅटेलमधील कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्यांसह संपूर्ण कचरा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. त्या कच-यामुळे नदीपात्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. फूटपाथवरील हातगाडी, पथारीवाले, चायनिज गाड्यांसह हाॅटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न हे टाकले जात आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. (Pimpri Chinchwad News)
पिंपरी-चिंचवड शहराची वरदायिनी असलेली पवना नदी चारही बाजूंनी प्रदूषित होत आहे. त्या प्रदूषणास काही घटक कारणीभूत ठरू लागले आहेत. यात शहरातील छोटे व्यावसायिक देखील नदी प्रदूषणात भर टाकत आहेत. काही हातगाडी, पथारीवाले, चायनिज विक्रेते, चिकन विक्रेते आणि छोटे हाॅटेल व्यावसायिक हे शिल्लक राहिलेले अन्न नदीपात्रात टाकत आहेत.
चिंचवडमधील तानाजीनगर, भाटनगर, लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ, काळेवाडी पुलाकडून जाणा-या रोडवर अशा वेगवेगळ्या भागात हाॅटेल वेस्टचा कचरा टाकला जातोय. यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने वेगवेगळ्या भागात कचराकुंड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे फूटपाथवर व्यवसाय करणारे हे लोक रात्री उशिरा कचरा कुंड्यामध्ये शिल्लक राहिलेले अन्न, छोटे व्यावसायिक हाॅटेल वेस्टचा कचरा टाकत होते.
काही दिवसांपूर्वी शहरातील कचराकुंड्या ओव्हर फ्लो होऊन कचरा इतरत्र पडू लागल्याने तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी कचराकुंडी मुक्त शहर मोहीम राबविली. शहरातील संपूर्ण कचराकुंड्या हटविण्यात आल्या. लोकांना आणि हाॅटेल वेस्टचा कचरा टाकण्यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा तयार करून त्यांचा कचरा स्वीकारण्यात येऊ लागला.
मात्र, सध्यस्थितीत छोट्या व्यावसायिकांना हाॅटेल वेस्टचा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पडू लागला आहे. फूटपाथवर व्यवसाय करणारे आणि छोट्या हाॅटेलचे दुकानदार वेस्ट कुठेही टाकू लागले आहेत. ते आरोग्य विभागाच्या गाडीची वाट पाहात बसत नाहीत. त्यामुळे हा हाॅटेल वेस्टचा कचरा नदीपात्रात पडू लागला आहे.
पवना नदी अगोदरच प्रदूषित असताना त्यात हाॅटेल वेस्ट कच-याची भर पडली आहे. नदीच्या पाण्यात हाॅटेल वेस्टचा कचरा मिसळून पाण्याची दुर्गंधी आणखी वाढत चालली आहे. याकडे महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने जागोजागी हाॅटेल वेस्टच्या कच-याचे ढीग साचू लागले आहेत.
पर्यावरण विभागाचे पत्र
चिंचवडच्या प्रभाग क्रमांक १९ मधील लिंकरोड स्मशानभूमी शेजारील पवना नदीपात्रात हाॅटेल धारकांकडून कच-याच्या पिशव्यात कचरा बांधून नदी आणि पात्रालगत जागेवर टाकत आहेत. याबाबत पर्यावरण विभागाने अ क्षेत्रीय कार्यालयास पत्र देऊन सदर ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असे पत्राद्वारे कळविले आहे.
दररोज हाॅटेलचा कचरा थेट नदीपात्रात टाकला जातोय. प्लास्टिक पिशव्यांमधून हा कचरा भरून नदीत टाकणे जैवविविधतेला धोका निर्माण करणारे आहे. याकडे पर्यावरण आणि आरोग्य विभागाने कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई करावी.
- विशाल कसबे, सरचिटणीस, युवक काॅंग्रेस, पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिलेले पत्र मिळाले आहे. त्यानुसार नदीपात्रात कचरा टाकणा-यावर कारवाई करण्यासाठी ग्रीन मार्शल पथक कार्यान्वित केलेले आहे. त्या पथकाकडून नदीत हाॅटेल वेस्ट असो की अन्य कुठलाही कचरा टाकणा-यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
- सुचित्रा पानसरे, सहायक आयुक्त, अ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.