Pimpri Chinchwad: अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सने शहराचे विद्रुपीकरण

पिंपरी-चिंचवड: महापालिकेकडून सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेतलेली होती. मात्र, शहरात मोक्याच्या ठिकाणी, जागोजागी, सिग्नलवर, उड्डाणपुलाखाली, बस थांब्यांवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सने शहराचे विद्रुपीकरण

आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाईचा फार्स, पिंपरी-चिंचवड पालिकेच्या महसुलावर पाणी; विद्युत खांबांवर बांधकाम व्यावसायिकांच्या किऑस्कची चलती

विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: महापालिकेकडून सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेतलेली होती. मात्र, शहरात मोक्याच्या ठिकाणी, जागोजागी, सिग्नलवर, उड्डाणपुलाखाली, बस थांब्यांवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच मागील सहा वर्षांपासून विद्युत खांबांवर बांधकाम व्यावसायिक बेकायदेशीर किऑस्क लावून जाहिरातबाजी करत आहेत. त्यामुळे पालिकेला आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. याकडे आकाशचिन्ह व परवाना अधिका-यासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स, किऑस्क लावण्यावर निर्बंध घातलेले आहेत. क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी न घेता ठिकठिकाणी, विशेषत: सिग्नलवर होर्डिंग लावले जात आहेत. त्यामुळे पादचारी, नागरिक व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विविध राजकीय पुढाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, यात धार्मिक कार्यक्रमाच्या जाहिरातींमुळे बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोणीही क्षेत्रीय कार्यालयात परवानगी न घेता बेकायदेशीर बॅनर्स, होर्डिंग्ज लावत आहेत. तरीही पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून होर्डिंग काढले जात नाहीत. सगळे नियम धाब्यावर बसवून होर्डिंग लावत शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.  (PCMC News)

शहरात आरोग्य विभागाने रस्ते, मंदिर, समूह शिल्पाची साफसफाई मोहीम हाती घेऊन कचरा, माती गोळा करत पाण्याने रस्ते, मंदिरे धुवून काढत स्वच्छता करण्यात आली. परंतु, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग मुळे शहराचा बकालपणा वाढला आहे. त्यामुळे स्वच्छतेची मोहीम राबवताना पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्सवर निष्कासन कारवाई करण्याकडे क्षेत्रीय अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.

बॅनर्स, फलकाने सिग्नल अदृश्य

शहरातील अनेक भागात अनधिकृतपणे होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर्स लावले जात आहेत. ते लावताना महापालिकेच्या क्षेत्रीय अधिका-यांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूल घटू लागला आहे. अनेकदा पदपथांवर अतिक्रमण करून आणि सिग्नलवर लावले जात आहेत. बेकायदेशीर लावलेले फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज हटविण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाची आहे. त्यांचे अतिक्रमण व धडक कारवाई पथक केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावणा-यांवर दंडात्मक अथवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात नाही. उलट होर्डिंग्ज, बॅनर लावणा-यांकडे डोळेझाक केली जात आहे.

बांधकाम व्यावसायिकांची फुकट जाहिरात?

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्जकडे दुर्लक्ष केले होते. शहरातील राजकीय नेत्यांचे अभय मिळाल्याने अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढली होती.  या अनधिकृत होर्डिंग्जमुळे कित्येक वर्षांपासून पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात होता. मात्र, किवळे येथे अनधिकृत होर्डिंग्ज पडून झालेल्या दुर्घटनेत चार नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या मोहिमेला जोर आला. तसेच पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने मागील सहा वर्षात विद्युत खांबांवर लावलेल्या किऑस्क बॉक्सची निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे शहरातील जाहिरात एजन्सीधारक अनधिकृतपणे विद्युत खांबांवर विविध व्यावसायिकांचे किऑस्क  लावून फुकटची जाहिरात करूरु लागले आहेत. त्यात बांधकाम व्यावसायिक सर्वाधिक जाहिराती दिसून येत आहेत. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

शहरात बॅनर्स, जाहिरातफलक लावण्यासाठी पालिकेकडून जागा निश्चित केलेल्या आहेत. बॅनर्स, जाहिरात फलक लावण्यासाठी त्यांना अधिकृत परवाना दिला जातो, पण काहीजण परवानगी न घेताच बॅनर्स, जाहिरात फलक लावत आहेत. शहरातील चौकाचौकात अनधिकृत बॅनर्स, फलक लावले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लवकरच स्वतंत्र पथक कार्यान्वित केले जाईल. क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण कर्मचारी, परवाना निरीक्षक यांचा समावेश करणार आहे. त्यानुसार अनधिकृत बॅनर्स, जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story