Pimpri-Chinchwad : थकबाकीदारांच्या दुकानाबाहेर वाजविणार बँड

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाखाहून अधिक असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाई सुरू आहे. यामध्ये खासगी संस्था, खासगी महावि‌द्यालये, शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औ‌द्योगिक कारखाने, शोरूम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृहे आदी आस्थापनांचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 12:10 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जप्तीची कारवाई सुरू; नावे वृत्तपत्रात होणार प्रसिध्द; हॉटेल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, कारखाने, रुग्णालये रडारवर

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाखाहून अधिक असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाई सुरू आहे. यामध्ये खासगी संस्था, खासगी महावि‌द्यालये, शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औ‌द्योगिक कारखाने, शोरूम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृहे आदी आस्थापनांचा समावेश आहे. त्यामुळे सदरील आस्थापनांच्या नावे वृत्तपत्रात प्रसिध्द करून त्यांच्या दुकानाबाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून एक लाखाहून जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्याचे आदेश संबंधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

त्यानुसार, करसंकलन विभागाने १० जानेवारीपर्यंत तब्बल ४१८ मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांच्याकडे तब्बल ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईवेळी १५११ मालमत्तांनी आपल्या थकीत कराचा २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ इतक्या भरणा केलेला आहे.

थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनदेखील कराचा भरणा केला नसेल अशा मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलावीत असेही आदेश करसंकलन मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयास देण्यात आले आहेत.

सदर थकबाकी असणाऱ्या आस्थापनांची यादी करसंकलन विभागाकडून तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयास कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. याचबरोबर अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाणार आहे.

त्याचबरोबर अशा थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी सदर आस्थापनांच्या बाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. याबरोबर सदर मालमत्तांवर चालू स्थितीमध्ये सुध्दा जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाकडून देण्यात आले असून शहरामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील एक लाखाहून जास्त रक्कम थकीत असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. शहरातील बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्यात येत असून मालमत्ताधारकांना आपल्या थकीत कराचा तत्काळ भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.

– प्रदीप जांभळे पाटील,  अतिरिक्त आयुक्त (१), महानगरपालिका…

शहरातील हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये आदी आस्थापनांची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. वरील आस्थापना चालू स्थितीमध्ये अथवा बंद झाल्यास महानगरपालिका कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

– अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त,   कर संकलन विभाग, महानगरपालिका

Share this story

Latest