अतिक्रमणविरोधात सव्वा वर्षांनंतर पालिकेला जाग!
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मोकळा श्वास घेता यावा, याकरिता रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण, मोठ्या रस्त्यालगतची दुकाने, सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण आणि अनधिकृत पत्राशेड, वीट बांधकामांवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण पथकांकडून प्रतिबंधात्मक कारवाई येत आहे. तब्बल सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पालिकेचे अतिक्रमण कारवाई पथकाला जाग येऊन हे पथक अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला आता दोन वर्ष पुर्ण होत आहेत. या प्रशासकीय राजवटीत अतिक्रमण धडक पथक व अनधिकृत बांधकाम व नियंत्रण पथक अॅक्टीव होऊन अपेक्षित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, मागील सव्वा वर्षात हे पथक निद्रिस्त अवस्थेत होते. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई थंडावल्या होत्या. परंतु निद्रिस्त झालेले पथक पुन्हा जागे झाले असून शहरातील कारवाईला प्रारंभ झाला आहे.
महापालिकेचे तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत बांधकाम व नियंत्रण पथकांकडून शहरात धडक कारवाई केली होती. त्यांनी नाशिक फाटा ते वाकड, सांगवी ते रावेत, रावेत ते मुकाई चौक, नाशिक फाटा ते मोशी टोल नाका, भोसरी ते दिघी, दिघी ते च-होली फाटा यासह अनेक भागातील सार्वजनिक मोठ्या रस्त्यावर वर्षांनुवर्षे अतिक्रमण करुन जागेवर ताबा मारणा-यांच्या दुकानांवर हातोडा मारला होता. त्यामुळे शहरातील बीआरटी मार्ग आणि सार्वजनिक मोठ्या रस्त्यावरील सर्व दुकाने हटवून रस्ते प्रशस्त झाले होते. तसेच शहरातील गल्लो-गल्ली फुटपाथवर अतिक्रमण करणा-या हातगाडी, पथारी, भाजीपाला विक्री अशा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना देखील जागेची आखणी करुन देत एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे हाॅकर्स झोन निर्माण करुन त्याठिकाणे सोडून इतरत्र फिरणा-यावर कडक कारवाई केली जात होती.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण पथकाकडून सार्वजनिक रस्ते मोकळे करणे, मोठे रस्ते, जागा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांपासून मोकळ्या करणे, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु आहे. शहरातील सार्वजनिक जागा नागरिकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने राबवण्यात येणारे विविध उपक्रम व विकास कामे, जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी जतन करणे आवश्यक आहे.
शहरातील अनधिकृत व्यावसायिक, पत्राशेड धारकांद्वारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते.रस्त्यावरच वाहने उभी केल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन बकालपणा वाढत आहे. या अडथळ्यांमुळे लहान-मोठे अपघातसुध्दा होत असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर आणि शहराच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच अधिकृत बांधकाम इमारतीमधील व्यावसायिक गाळेधारकांवरही अन्याय होत आहे.
या भागात केली कारवाई
महापालिकेच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाकड ते पिंपळे निलख, जगताप डेअरी चौक ते भुजबळ चौक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रावेत-बीआरटी रोड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मोशीतील जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम चौक या रस्त्यांलगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. सात दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक चौरस फूट क्षेत्रफळामध्ये असणारी अनधिकृत पत्राशेड, वीट बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.
'स्वच्छ सुंदर' शहरात पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने प्रगती होत आहे. लोकसंख्या देखील वाढली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहीत असणे गरजेचे आहे. सर्वच प्रमुख रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत अनधिकृत व्यवसायिकांच्या पत्राशेडचा अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. नागरिकांच्या तक्रारीसुद्धा पालिकेकडे आल्याने अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. यापुढे देखील ही अतिक्रमण कारवाई प्रक्रिया निरतंर राहील.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका
शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अतिक्रमण समस्यांवर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी स्वच्छ, सुंदर आणि संघटित शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी येत्या महिन्याभरात उर्वरित क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अशीच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येईल.
- प्रदिप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.