संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरून दर महिन्याला किमान २५ ते ३० अधिकारी-कर्मचारी हे नियत वयोमानानुसार, स्वेच्छासेवानिवृत्ती घेत आहेत. विविध आजारांनी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेखील होत आहे. या अधिकारी व कर्मचा-यांची संबंधित विभागाकडून सेवानोंद पुस्तकासह प्रथम पडताळणी, त्यानंतर मुख्य लेखापरीक्षण विभागाकडे तपासणीकामी पाठविण्यात येते. सेवानोंद पुस्तकात किरकोळ आक्षेपांमुळे अनेकांची सहा महिने ते एक वर्षाहून अधिक काळ देय रकमा अदा करण्यास दिरंगाई होऊ लागली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शनसह देय रकमासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचा-यांची प्रकरणे निर्धारित वेळेत पूर्ण निकाली काढण्याची मागणी कर्मचारी महासंघाकडून केली आहे. याबाबत महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडून सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सेवानोंद पुस्तकातील किरकोळ आक्षेपांवर संबंधित विभागातील अनेक प्रकरणे लेखा विभाग, लेखापरीक्षण विभागाकडून निकाली काढण्यास पाठपुरावा करावा लागत आहे.
महापालिकेच्या विविध विभागातून दर महिन्याला अधिकारी, कर्मचारी नियत वयोमानानुसार व स्वेच्छनिवृत्ती घेत आहेत. महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या देय रकमांची शेकडो प्रकरणे विविध विभागात प्रलंबित आहेत.
यामध्ये सेवानिवृत्त कर्मचा-यांची ही प्रकरणे किरकोळ आक्षेप नोंदवून प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. काही कर्मचा-यांच्या सेवानोंद पुस्तकावर स्वाक्षरी प्रकरणांवर नजर चुकीने तारखांची नोंद चुकणे, अंतिम वेतन प्रमाणपत्र तसेच काही कागदपत्रे न जोडणे, यासह विविध लेखी आक्षेप लाऊन अनेक प्रकरणे संबंधित विभागाकडून पुन्हा पाठविली जात आहेत. त्यामुळे सर्व प्रक्रियेत इन वर्ड, आऊट वर्ड, वर्कशीट, पूर्तता आणि विभाग प्रमुखाची स्वाक्षरी यामुळे विलंब होत आहे.
दरम्यान, सेवानोंद पुस्तकांचे लेखापरीक्षण विभागाकडून २०१०-२०११ पर्यंत लेखापरीक्षण झालेले दिसून येत आहे. कर्मचा-यांची सेवानिवृत्तीनंतरची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावी, अशी मागणी कर्मचारी महासंघाकडून अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी केली आहे.