संग्रहित छायाचित्र
तळवडे येथील ६० एकर गायरान जागेत जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) विकसित करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. मात्र, एवढ्या मोठ्या परिसरात जास्त खर्चाचे उद्यान ‘सीएसआर’मधून उभारणे शक्य नसल्याचे सांगत महापालिका आता सुमारे ७६ कोटींचे हे पार्क स्वखर्चाने उभारणार आहे. या खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
तळवडे भाग रेडझोन प्रभावित आहे. त्यामुळे विकासकामे आणि पायाभूत सोईसुविधा देण्यात अडचणी येत होत्या. तळवडे येथे गायरान जागेत हरीण उद्यान (डीअर पार्क) बनवण्याचा निर्णय झाला होता; परंतु, नागरी वस्ती वाढल्याने ‘डीअर पार्क’चा निर्णय रद्द करून तेथे जैवविविधता उद्यान तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापालिकेने सुरुवातीला सीएसआर निधीतून उद्यान विकसित करण्याचे नियोजन असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, आता महापालिका खर्चातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. उद्यानात वेगवेगळ्या वनस्पती, दुर्मीळ औषधी झाडे व वेली, देशी जातीची झाडे, फळ व फूलझाडांची लागवड केली जाणार आहे. प्राणी, पक्षी अधिवास निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय, पर्यटकांसाठी ट्रॅक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मनोरंजनाची साधने असणार आहेत.
बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी महापालिकेने दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवली. पहिल्या निविदेवेळी चार कंत्राटदार सहभागी झाले. मात्र, त्यापैकी तीन कंपन्या अपात्र ठरल्या. बीव्हीजी इंडिया ही एकच कंपनी पात्र ठरली. एकच कंपनी पात्र ठरल्यामुळे पुन्हा फेरनिविदा मागवण्यात आली. दुसऱ्या वेळी बीव्हीजी इंडिया या कंपनीची एकच निविदा आली. वास्तविक पुन्हा फेरनिविदा मागवणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने तसे केले नसून बीव्हीजी कंपनीलाच बायोडायव्हर्सिटी पार्क काम दिले आहे.
त्यात भारत विकास ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची एकमेव निविदा आली. त्यांनी दरापेक्षा ०.१० टक्के कमी दराची निविदा सादर केली. यासाठी तब्बल ७५ कोटी ९३ लाख ८८ हजार ८१४ रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम बीव्हीजी इंडिया कंपनी करणार आहे. कामाची मुदत १८ महिने असणार आहे.
स्वच्छता करणारी कंपनी काम
बीव्हीजी इंडिया कंपनीने आतापर्यंत स्वच्छतेविषयक काम केले आहे. मात्र, आता ही कंपनी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार आहे. बीव्हीजी कंपनीला असा अनुभव नसल्याची चर्चा आहे. असे असताना ७६ कोटींचे पार्क उभारण्याचे काम महापालिकेने कसे काय दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.