संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: महापालिका हद्दीतील सोसायट्यांची सांडपाणी प्रक्रिया सयंत्र (एसटीपी) कायमस्वरूपी कार्यान्वित राहायला हवी , याकरिता सोसायटीवर लक्ष ठेवण्यास सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही ठराविक व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून हे कोटेशन तयार केले आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असून नागरिकांवर अन्याय करणारा आहे. हे कोटेशन तत्काळ रद्द करावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad News)
आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोटेशनमधील अटीशर्ती आणि सल्लागारांनी करावयाची कामे ही यादी पाहता सोसायट्यांचा मानसिक छळ होणार आहे. सोसायटीतील नागरिकांना भीती घालून अव्वाच्या सव्वा दराने एसटीपी या अटींची पूर्तता करायला सांगितले जाऊ शकते. शहरातील सर्व सोसायट्यांमधील एसटीपी संदर्भातील सर्व निर्णय खासगी एजन्सीकडे सोपवून तोंड दाबून बुक्यांचा मार्ग सहन करणे एवढच सोसायट्यांच्या हातात उरणार आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठेकेदार एजन्सीला डोळ्यासमोर ठेऊन ही प्रक्रिया राबवली जात आहे. पालिकेचे अधिकारी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
खासगी सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया संयंत्र कायमस्वरूपी कार्यान्वित राहण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागार एजन्सीची नेमणूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय चुकीचा, बेकायदा आणि शहरातील नागरिकांवर अन्याय करणारा आहे. यातून प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे. त्यामुळे सदर कोटेशन प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.