भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या शहर कार्यकारिणी बैठक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठराव मांडून दावा केला आहे.
तिन्ही विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. शहरात राष्ट्रवादीचे संघटनही मजबूत झाले असून आगामी निवडणुकीत निश्चित त्याचा फायदा होणार आहे. पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( एसपी) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहर कार्यकारिणीचा बैठक घेऊन ठराव करण्यात आला. तिन्ही विधानसभा पक्षाने लढाव्यात व निष्ठावंतांना प्राधान्याने उमेदवारी देण्यात यावी, असा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमताने ठराव मंजूर केला. यावेळी सर्व इच्छुकांची नावे देखील लिफाफ्यात पाठवण्यात आली. सदर ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि पक्ष संसदीय मंडळाला ठराव प्रत देण्यात येणार आहे. यावेळी शहरातील सर्व मुख्य कार्यकारिणी पदाधिकारी, सेल, फ्रंट प्रमुख, पिंपरी-चिंचवड, भोसरी विधानसभा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला प्रदेश आणि शहर पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अडचणीच्या काळात पक्षात जे न डगमगता पक्षासाठी प्रामाणिकपणे शरद पवार साहेबांबरोबर राहिले. त्यांचा प्रथम प्राधान्याने विचार पक्ष करेल आणि निष्ठावंत उमेदवाराला नक्कीच संधी मिळेल. तो विजयी होईल याची आम्हाला शास्वती आहे. पक्ष संघटनेची संपूर्ण ताकद उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यरत राहील. शहरातील तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाकडे असावे ही आमची आग्रही मागणी असणार आहे.
- तुषार कामठे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.